पोटाला चिमटा काढून फी भरली, आता आत्महत्याच करायची का? आश्वासन न पाळल्यास बेमुदत धरणे आंदोलन; संतप्त पालक-विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षण संचालनालयावर (DTE) धडक मोर्चा!

SITS नऱ्हे कॅम्पसचा सावळागोंधळ: दोन महिने उलटूनही लेक्चर्स व प्रॅक्टिकल्स ठप्प; ‘कॅप’ राऊंडमधून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सीईटी सेल आणि सरकारविरुद्ध तीव्र आक्रोश पुणे विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावे, या आशेने शेतकरी, कष्टकरी आणि नोकरदार पालकांनी प्रसंगी जमिनी विकून, अतोनात कर्ज काढून व पोटाला चिमटा लावून लाखो रुपयांची फी भरली. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलच्या अत्यंत चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या धोरणांमुळे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SITS), नऱ्हे कॅम्पस येथे प्रवेश घेऊन दोन महिने उलटले तरी ना लेक्चर्स होत आहेत, ना प्रॅक्टिकल्स. या गंभीर शैक्षणिक नुकसानीविरोधात आणि भविष्याशी चाललेल्या खेळखंडोब्याविरोधात आज ‘एस आय टी एस नऱ्हे पालक संघर्ष समिती’च्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय (DTE), पुणे येथे विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत तीव्र जनआंदोलन छेडले.
२८ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांना पहिले लेखी निवेदन देऊन कॉलेज व प्रॅक्टिकल्स सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, कॅम्पस आणि हॉस्टेल पूर्ववत सुरू झाले नाही. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी समितीने नवले यांची पुन्हा प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती मांडली. त्यावेळी संस्थेला काही अडचणींचा सामना करावा लागत असून पुढील काही दिवसांत सर्व सुरळीत होईल, अशी नेहमीप्रमाणे मखलाशी करत केवळ आश्वासने देण्यात आली. यानंतर समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेतली असता, विद्यापीठाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून २४ तासांच्या आत संस्थेला ‘शोकॉज नोटीस’ बजावली. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थ्यांचे आयुष्य टांगणीला लागलेले असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचे वारंवार प्रयत्न करूनही ते पालक समितीला भेटायला तयार नाहीत. सामान्य पालकांना भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या अशा सरकारकडून सामान्यांनी न्यायाची काय अपेक्षा ठेवायची? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
“नोकरदार, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाने आपल्या रक्ताचा घामाचा पैसा, प्रसंगी शेतजमिनी विकून आणि अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज काढून मुलांची फी भरली आहे. कॉलेजचे अधिकृत हॉस्टेल बंद असल्यामुळे अनेक पालकांना बाहेर जास्तीचे पैसे मोजून खाजगी खोल्या, हॉस्टेल आणि मेस लावावी लागली. महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना हा अवाढव्य आर्थिक भुर्दंड पालकांनी कसा सहन करायचा? एवढा पैसा खर्च करूनही दोन महिने मुलांना शून्य शिक्षण मिळत आहे. अशा नैराश्यातून जर एखाद्या हवालदिल पालकाने किंवा विद्यार्थ्याने आत्महत्या केली, तर त्याला केवळ आणि केवळ हे सरकार, उच्च शिक्षण विभाग आणि सीईटी सेलच जबाबदार राहील!” असा घणाघाती आरोप समितीचे प्रतिनिधी प्रशांत कांबळे यांनी केला.
या धडक आंदोलनानंतर पालक संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. सुरेश आ. पाटील यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द करण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने पुढील मागण्या मांडण्यात आल्या:
SITS नऱ्हे कॅम्पसमधील प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन या संस्थेतून तात्काळ रद्द करून दुसऱ्या सक्षम शासकीय किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये वर्ग (Transfer) करण्यात यावेत.
महत्त्वाची अट: सरकारने व शिक्षण मंत्र्यांनी मुलांना दुसऱ्या संस्थेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांशी प्रत्यक्ष चर्चा करावी, विद्यार्थ्यांच्या घराच्या जवळ असणारे व त्यांच्या सोयीचे कॉलेज कोणते आहे हे विचारून, प्रत्येकाशी बोलणी करूनच प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्ण न्याय द्यावा, ही समितीची ठाम भूमिका आहे.
जोपर्यंत अधिकृत स्थलांतराची (Transfer) प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत दररोजचे लेक्चर्स व प्रॅक्टिकल्स ऑफलाइन पद्धतीने पूर्ण क्षमतेने नियमित सुरू ठेवावेत.
पालकांकडून घेतलेली अवाढव्य हॉस्टेल व शैक्षणिक फी सव्याज परत करण्यात यावी.
हे निवेदन स्वीकारताना स्मिता गाडे सहसंचालक यांनी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही आणि या सर्व मागण्या नक्कीच तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती शासकीय पावले उचलली जातील, असे लेखी आश्वासन पालक समितीला दिले.
अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन जर वेळेत पाळले नाही, तर केवळ मोर्चा काढून न थांबता मंत्रालयासमोर व तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा पालक संघर्ष समितीने यावेळी दिला. या आंदोलनात समितीचे सदस्य नामदेव तौर, राजेंद्र बल्लाळ, किशोर मोहिते, सुनील बोरगे, रमेश गायकवाड, अंजली ठोंबरे, रेणुका यादव, संजय गाडेकर, वैभव जावहिरे, शिवाजी ठोबरे, संपतराव घोरपडे, नारायण खळकर, संतोष पवार, शंकरराव होणराव, राजेंद्र काळे, यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थिनी तनया कांबळे,
कृपा जावहिरे,
अदितीतरी गायकवाड,
तन्मयी बल्लाळ,
तेजस्विनी बोरघे,
अवधूत यादव,
संस्कार खालडकर,
विनायक मोहिते,
अथर्व बोडके,
सक्षम गायकवाड,
शिवम होनराव यांच्यासह अनेक विद्यार्थी घोषणाबाजी करत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button