दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे कात्रजमध्ये तिसरे मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आंबेगाव खुर्द कात्रज येथे आरोग्य सुविधा

पुणे : ईश्वराची सेवा केवळ मंदिरातील पूजेपुरती मर्यादित नसून, गरजू माणसाच्या दुःखात सहभागी होऊन त्याला आधार देण्यातही ईश्वरसेवेचा भाव सामावलेला आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा या विचारातून देवमंदिराकडून मानवसेवेच्या महामंदिराकडे वाटचाल करत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांनी जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा उपक्रम सुरू ठेवला आहे. या अभियानाचा विस्तार करत आंबेगाव खुर्द, कात्रज येथे तिसरे मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष सुनील रासने, राजेंद्र गावडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, विशाल ढनाळ, अजय मोझर, राजू वायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आरोग्य तपासण्या आणि उपचार सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी व सहकार्यांनी याचे नियोजन केले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, अभियानांतर्गत यापूर्वी सारसबागेजवळील हिराबाग कोठी आणि धनकवडीतील काशिनाथ पाटील नगर येथे दोन आरोग्य सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आता तिसरे केंद्र स. नं. ४४/५, गगनगिरी हिल्स, अचल फार्मजवळ, सच्चाई माता मंदिर परिसर, पाण्याच्या टाकीजवळ, आंबेगाव खुर्द, कात्रज येथे सुरू झाले आहे.

या केंद्रामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, जनरल ओपीडी, औषधोपचार आणि ईसीजी तपासणीची सुविधा उपलब्ध असेल. तसेच श्रवण क्षमता तपासणी व श्रवण यंत्र वाटप, कृत्रिम अवयव व वैद्यकीय उपकरणांचे वाटप, फिजिओथेरपी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंचर उपचार आणि लसीकरण अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत. याकरिता पुणे मनपा आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

हे केंद्र दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार असून दर रविवारी बंद राहील. या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ट्रस्टच्या २५०, बुधवार पेठ, गणपती भवन कार्यालय, पुणे येथे सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२०-२४४७९२२२ किंवा ०२०-२४४३०५२७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button