पुणे : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर युवा पिढीने उद्योजकतेला प्राधान्य देऊन रोजगारनिर्मितीवर भर दिला पाहिजे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी स्टार्टअप्स आणि उद्योगांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आयोजित ‘कारोबार ९.० – सूर्यभारत जननेक्स्ट स्टार्टअप फेस्ट’मध्ये ते बोलत होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी यशस्वी युनिकॉर्न कंपन्यांचा व्यावसायिक प्रवास, नवकल्पना आणि उद्योजकीय कौशल्यांचे सादरीकरण केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि रोजगारनिर्मितीची मानसिकता विकसित करण्यावर संस्थेचा भर आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय उभारणी आणि स्टार्टअप्सच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
संस्थेच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांनी सूर्यभारत इंडस्ट्रियल रिसर्च ज्ञानपीठाच्या (एसबीआयआरडी) माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व नवोन्मेष विकासाचे स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक आणि संशोधकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपसंचालक हृषीकेश धांडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सुनील फुलारी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.