शुक्ल
मुलांच्या मानसिक आरोग्यासह आनंदाला प्राधान्य द्यावे : डॉ. भूषण शुक्ल
डॉ. ज्ञानेश्र्वर मुळे फाऊंडेशनच्या ‘चांगुलपणाची चळवळ’ दिवाळी अंकाचे लोकार्पण
पुणे : आजच्या पिढीतील पालक, शिक्षकांनी मुलांना केवळ गुणांच्या आणि पैशांच्या मागे लागण्याचा स्रोत न बनविता त्यांच्यावर गुणांचे ओझे लादू नये. मुलांमधील सुप्त गुण, आंतरिक शक्तींना ओळखण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच मानसिक आरोग्यासह आनंदाला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालमानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनी केले. आंतरिक शक्ती ही आपली खरी ताकद असते याची जाणीव पालकांनी मुलांना करून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
डॉ. ज्ञानेश्र्वर मुळे फाऊंडेशन प्रकाशित ‘चांगुलपणाची चळवळ’ या दिवाळी अंकाचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. २) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. भूषण शुक्ल बोलत होते. बालरोग तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पडळकर, डॉ. ज्ञानेश्र्वर मुळे फाऊंडेशनचे संस्थापक, माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्र्वर मुळे, अंकाच्या संपादिका शुभांगी मुळे मंचावर होते. बेलराईज इंडस्ट्रिजच्या संचालिका सुप्रिया बडवे, श्री रवळनाथ को-ऑप. हाऊसिंग फायनान्सचे संस्थापक संचालक एम. एल. चौगुले, सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख, संस्थेचे सदस्य रियाज पिरजादे आदी उपस्थित होते. खडकीतील संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. ज्योत्स्ना पडळकर म्हणाल्या, आधुनिक काळात मुलांच्या शारीरिक आरोग्यात मोठी सुधारणा झाली असली, तरी त्यांचे मानसिक आरोग्य हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. मुलांप्रमाणेच पालकांमध्येही सध्या मानसिक प्रश्न वाढीस लागले आहेत. यावर मात करण्यासाठी पालकांनी केवळ पुस्तकी अर्थाने आरोग्य साक्षर न राहता आरोग्य सक्षम होणे गरजेचे आहे. मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वप्रथम पालकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सक्षम असणे हा त्याचा पाया आहे. ताणतणावाच्या काळात संयम राखत, स्वतःला सक्षम बनवून मुलांचे मानसिक स्वास्थ्य जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाजातील सकारात्मक विचारधारा, संवेदनशीलता आणि माणुसकीला लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी अवकाश खुले केले असल्याचे शुभांगी मुळे यांनी सागितले. या दिवाळी अंकाच्या माध्यमातून समाजाचा सकारात्मक, सर्जनशील, समावेशक प्रवास मांडला जात आहे.
हर्षदा बावनकर यांनी सूत्रसंचालन केले तर रियाज पिरजादे यांनी आभार मानले.
=-=-
‘चांगुलपणाची चळवळ’ या दिवाळी अंकातून विविध सामाजिक प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असून समाजाला त्याचाच आरसा दाखविण्यासाठी ज्वलंत विषयांवर दरवर्षी अंक प्रकाशित केला जात आहे. मानसिक विकास एकांगी झाला तर त्याची परिणिती मानसिक रुग्णात देखील होऊ शकते. त्यामुळे मुलांचे बालपण आनंदी आणि सकारात्मक असणे आवश्यक आहे. ज्या योगे त्यांना अनेक कठीण प्रसंगात लढण्याची कला अवगत होईल आणि त्यांचे आयुष्य सकारात्मकतेने घडेल.
- डॉ. ज्ञानेश्र्वर मुळे, संस्थापक
=-=-
फोटो ओळ : ‘चांगुलपणाची चळवळ’ दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) सुप्रिया बडवे, डॉ. ज्ञानेश्र्वर मुळे, डॉ. भूषण शुक्ल, डॉ. ज्योत्स्ना पडळकर, शुभांगी मुळे.