-संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ यांनी स्वीकारला ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’
पुणे : रक्तदान क्षेत्र, वैद्यकीय मदत तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुजय प्रतिष्ठान ‘मैत्री रक्ताची’ या संस्थेला बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर भारत यांच्या वतीने ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचा स्वीकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ यांनी केला. प्रदीप दादा कदम आणि बॉम्बे ब्लड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत करणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य सातत्याने पुढे नेण्याचे काम सुजय प्रतिष्ठान ‘मैत्री रक्ताची’ ही संस्था करत आहे. संस्थेच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, रक्तदाते, स्वयंसेवक आणि हितचिंतक यांच्या सामूहिक कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सन्मानाबद्दल सुजय प्रतिष्ठान ‘मैत्री रक्ताची’ संस्थेच्या वतीने बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर भारतचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव, प्रदीप दादा कदम आणि संपूर्ण आयोजक टीमचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.