सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे उद्या शनिवारी (ता. ३१)‘कारोबार ९.० – सूर्यभारत जननेक्स्ट स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन

  • युनिकॉर्न कंपन्यांचा व्यावसायिक प्रवास, नवकल्पना आणि उद्योजकीय कौशल्यांचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा, नावीन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पनांना व्यासपीठ देण्यासह स्टार्टअप विश्वाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे उद्या, शनिवारी (ता. ३१) ‘कारोबार ९.० – सूर्यभारत जननेक्स्ट स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. बावधन येथील ‘सूर्यदत्त’च्या कॅम्पसमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या विभागप्रमुख रसिका गुमास्ते आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “या आंतरमहाविद्यालयीन व्यावसायिक प्रदर्शनात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी भारतीय युनिकॉर्न कंपन्यांचा यशस्वी प्रवास, त्यांची व्यवसाय प्रारूपे, नावीन्यपूर्ण संकल्पना, विपणन धोरणे, गुंतवणुकीचा प्रवास आणि व्यवसाय विस्ताराच्या रणनीती सादर करणार आहेत. विविध आकर्षक स्टॉल्स, व्यावसायिक प्रात्यक्षिके आणि ‘स्टॉल टू सेल’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायातील संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळणार आहे. व्यवस्थापन आणि उद्योजकतेचे शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक जगाचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उत्पादनाचे सादरीकरण, विपणन, विक्री, ग्राहकांशी संवाद आणि व्यवसाय व्यवस्थापन या विविध बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून घेता येणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिक निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.”

‘कारोबार ९.०’च्या पुढील टप्प्यात सूर्यभारत इंडस्ट्रियल रिसर्च ज्ञानपीठ (एसबीआयआरडी) यांच्या माध्यमातून सूर्यदत्त संस्था समूहातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि नवोन्मेष विकासाचे स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याचा प्रस्ताव आहे. या उपक्रमांतर्गत निवडक विद्यार्थी आणि नवउद्योजकांना उद्योग क्षेत्रातील अनुभवी नेते, यशस्वी उद्योजक, संशोधक आणि विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पक संकल्पनांना विकसित करून त्यांचे व्यवहार्य व्यावसायिक उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

युनिकॉर्न कंपन्यांच्या यशस्वी वाटचालीचा अभ्यास करताना स्टार्टअप उभारणीसाठी आवश्यक असलेले नियोजन, भांडवल उभारणी, बाजारपेठेची निवड आणि व्यवसायविस्तार यांविषयी विद्यार्थ्यांना समजून घेता येणार आहे. नव्या व्यावसायिक संकल्पना प्रत्यक्षात आणताना येणारी आव्हाने आणि उपलब्ध संधी यांचीही ओळख या माध्यमातून होणार आहे. ‘विकसित भारत @ २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असलेला हा महोत्सव युवकांमध्ये उद्योजकता, नवोन्मेष, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची मानसिकता विकसित करण्यास प्रोत्साहन देणार आहे. शिक्षण, उद्योग, संशोधन आणि उद्योजकता यांची सांगड घालण्याच्या सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या व्यापक दृष्टिकोनाशीही हा उपक्रम सुसंगत आहे, असे डॉ. प्रतीक्षा वाबळे यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्याबरोबरच त्यांच्यातील उद्योजकीय क्षमता विकसित करणे आणि भविष्यातील व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करणे, हा या महोत्सवामागील महत्त्वाचा हेतू आहे. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना व उद्योजकीय कौशल्यांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button