मनोहारी मैत्र संघातर्फे मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरणसत्याचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकरण व्हावे : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : संस्कृती ही समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा, सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे. संस्कृतीला सत्याचा आधार नसेल तर संस्कृती निरर्थक ठरते. मराठी संस्कृती केवळ सत्यावरच आधारलेली नसून ती संतत्वावर सुद्धा उभी आहे. वृत्तीत सेवा-समर्पण भाव नसेल तर संस्कृतीला अर्थ नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. सत्याचे राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरण करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
मनोहारी मैत्र संघ, पुणेतर्फे मातृभूमी सेवा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी (दि २९) आयोजित करण्यात आला होता. पुरस्कारांचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोहारी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते मंचावर होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुरुवर्य केशवराव जेधे स्मरणार्थ पुरस्कार लालासाहेब मोहिते यांना, छत्रपती व्यंकोजीराजे भोसले स्मरणार्थ पुरस्कार ॲड. मारुती आबा गोळे यांना, ह. भ. प. हैबतराव आरफळकर स्मरणार्थ पुरस्कार डॉ. अरविंद नेरकर यांना, आचार्य प्र. के. अत्रे स्मरणार्थ पुरस्कार डॉ. सुभाष तळेकर यांना, मदर तेरेसा स्मरणार्थ पुरस्कार कैलास दुधाळे यांना तर डॉ. आनंदीबाई जोशी स्मरणार्थ पुरस्कार डॉ. गजेंद्र देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
संस्कार इंगळे, दक्ष सरकार या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.
इतिहासात डोकावले असता असे दिसते की, समाजसेवेचे व्रत घे ऊन अनेकांनी कार्य केले तीच परांपरा नि:स्वार्थपणे सुरू आहे, याबद्दल डॉ. सबनीस यांनी आनंद व्यक्त केला. समतेचा आणि सत्याचा प्रतिसाद समाजात उमटणे, निर्माण होणे आवश्यक असून तो पेलत त्याची परंपरा निर्माण होणे मोलाचे आहे, असेही ते म्हणाले.
मनोहारी मैत्र संघातर्फे ज्यांचे सत्कार करण्यात आले ते महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने उर्जास्रोत आहेत, असे सांगून राजेंद्र पवार म्हणाले, सत्कारमूर्तींनी सेवाभावी वृत्तीने समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पोहोचवलेला आहे तो खऱ्या अर्थाने अलौकिक आहे.
ॲड. प्रमोद आडकर यांनी मनोहारी मैत्र संघाच्या कार्याचे कौतुक करून शोधक नजरेने सामाजिक व सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव यथोचित आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकात मनोहर कोलते यांनी उपक्रमाविषयी अवगत केले. पराग शिळीमकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ : मनोहारी मैत्र संघ आयोजित मातृगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारार्थींसमवेत डॉ. श्रीपाल सबनीस, राजेंद्र पवार, ॲड. प्रमोद आडकर, मनोहर कोलते आदी.
प्रति,
मा. संपादक
मनोहारी मैत्र संघ, पुणेतर्फे मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (दि. २९) झाले. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
मनोहर कोलते, संघप्रमुख
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button