स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीरगणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, संजय ऐलवाड पुरस्काराचे मानकरी

पुणे : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, संजय ऐलवाड हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत.
पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. २०२५ साली प्रसिद्ध झालेल्या गणेश मतकरी यांच्या ‘इअरफोन्स’ तर प्रणव सखदेव यांच्या ‘के कनेक्शन्स’ या किशोर-कुमारवयीन तसेच जेन-झी गटासाठी लिहिलेल्या पुस्तकाला रुपये पाच हजार, आश्लेषा महाजन यांच्या ‘गप्पी गप्पा आणि इतर कथा’ तसेच ऋषिकेश दाभोळकर, हर्षल कोऱ्हाळे यांच्या ‘कुल्फी’ दिवाळी अंक २०२५ या बाल साहित्यास रुपये तीन हजार तर अभिषेक जाखडे लिखित ‘जंगलातलं चांदणं’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच आतील चित्रांसाठी चित्रकार सई देशपांडे यांना दोन हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणून श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फुलपाखरू’ तर संजय ऐलवाड यांच्या ‘झिब्राची गोष्ट’ या पुस्तकास प्रत्येकी एक हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवनमधील मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. व कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई अत्रे या बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२३ पासून मराठीतील बालसाहित्यकाराला पुरस्कृत करण्याचा मानस डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केला. त्यासाठी दरवर्षी प्रकाशित उत्तम बालसाहित्यकृती साकारणाऱ्या लेखकांना पुरस्कार देण्यात येत असून कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असल्याचे प्रसाद भडसावळे यांनी सांगितले.
श्रीमती इंदिराबाई या एक शिक्षिका म्हणूनच नाही तर बालसाहित्यकार म्हणूनही ओळखल्या जात. त्यांनी आपल्या लेखनातून मुलांना संस्काररक्षमता व गुणग्राहकताही शिकविली. आजच्या काळातील अशाच कळकळीच्या बालसाहित्यकारांचा सन्मान व्हावा, हा या पुरस्काराचा उद्देश असल्याचे डॉ. भारती एम. डी. यांनी सांगितले.

फोटो : गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, ऋषिकेश दाभोळकर, हर्षल कोऱ्हाळे, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, संजय ऐलवाड
प्रति,
मा. संपादक
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
प्रसाद भडसावळे, पुरस्कार संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button