सरसेनापती हंबीरराव मोहिते बलिदान दिन साजरा’सरसेनापती हंबीरराव वार्षिक दिनदर्शिका’ तसेच ‘ सार्वभौम स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : स्वराज्याचे महान सेनानायक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या शौर्य, निष्ठा आणि पराक्रमाला उजाळा देण्यासाठी त्यांच्या बलिदान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सरसेनापती हंबीरराव वार्षिक दिनदर्शिका’ तसेच ‘ सार्वभौम स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
इतिहास प्रबोधन समिती, महाराष्ट्र, श्री शिवशंभू विचार मंच, महाराष्ट्र आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्य रथ सोहळा समिती यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, योगेश थत्ते, सुधीर थोरात, शिरीष मोहिते, सौरभ कर्डे उपस्थित होते. कार्यक्रमात इतिहासतज्ञ विक्रमसिंह मोहिते यांनी ‘मराठ्यांची युद्धनिती’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी गोरक्षक शिवशंकर स्वामी यांचा सन्मान करण्यात आला.
भानुप्रताप बर्गे म्हणाले, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, हंबीरराव यांसारखे त्याग, शौर्य आणि निष्ठेचे प्रतीक असलेले आदर्श कुठेतरी विसरत चाललो आहोत. परकीय आक्रमणे अनेक झाली, संकटे असंख्य आली; तरीही हिंदू धर्म, संस्कृती कधीच संपली नाही आणि कधीच संपणार नाही. मात्र केवळ इतिहासाचा अभिमान बाळगून चालणार नाही. आपल्या स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी जेव्हा आपण दाखवू, तेव्हाच खरा बदल सुरू होईल. आपल्या परंपरा, रुढी जपताना त्यातील चुकीच्या प्रथा, अन्यायकारक बाबी यांविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य आपण दाखवले पाहिजे. तोपर्यंत समाजात, राज्यात आणि देशात अपेक्षित बदल घडणार नाही.
शिरीष मोहिते म्हणाले, सरसेनापती हंबीरराव मोहिते हे निष्ठा, कर्तव्य आणि बलिदानाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी पुण्यात मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. पुढील वर्षापासून याच दिवशी “महाराणी ताराबाई पुरस्कार” प्रदान करण्यात येईल.
कॅलेंडर तयार करण्यासाठी दत्ता मोहिते, संदीप मोहिते, अविनाश मोहिते, रोहन मोहिते, विक्रांत मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.सुधीर थोरात यांनी प्रास्ताविक केले. योगेश थत्ते यांनी आभार मानले, सौरभ कर्डे यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. सुधीर पाचपोर यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले, गिरीष पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले.
