दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टजय गणेश रुग्णसेवा अभियान
दिव्यांगांना उपकरणे वाटपासाठी
दि.२५ ते ३१ जानेवारी शिबीर
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानात दिव्यांगांना विविध उपकरणे वाटपासाठी दि.२५ ते ३१ जानेवारीपर्यंत सारस बागेजवळील हिराबाग कोठी येथे शिबीर भरविण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागातून ८५५ नागरिकांनी दिव्यांगांसाठीची उपकरणे मिळावीत यासाठी नोंदणी केली आहे. या सर्व नोंदणीदारांना शिबीरात उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. नावनोंदणी केलेल्या दिव्यांगांमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे, अशी माहिती रासने यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आपल्या पालकांसह दिव्यांग येणार आहेत, त्यामुळे शिबिराचा कालावधी सात दिवसांचा ठेवण्यात आला आहे. या शिबीरात कृत्रिम हात, पाय, जयपूर फूट, कॅलिपर, व्हिल चेअर, कुबड्या, काठ्या, श्रवणयंत्रे अशा साहित्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती रासने यांनी दिली आहे.
शिबिरासाठी पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा ऑटोकाम सिस्टिम लिमिटेड, जयपूर फूट इंदोर, ॲलिम्को कंपनी, इनाली फौंडेशन आणि विपला फौंडेशन या संस्थांचे सहकार्य मिळणार आहे. सुवर्णयुग तरूण मंडळ शिबिराची व्यवस्था पहाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना
मोफत श्रवणयंत्रे
ट्रस्टच्या वतीने ३० जानेवारी रोजी फडके हॉल, खजीना विहिर चौक, सदाशिव पेठ येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात २५० ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ट्रस्टकडे नाव नोंदविलेल्यांसाठीच हे वाटप होणार आहे.
कळावे.
आपला,
सुनील रासने,
अध्यक्ष,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
राजेंद्र परदेशी,
वैद्यकीय विभाग व्यवस्थापक,
फोन : ९९२२२ ६२१७४
