-युद्ध जिंकण्यास शस्त्र आणि युग घडविण्यास आई लागतेव्याख्याते गणेश शिंदे यांचे मत : अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने माऊली व प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : आई असणे ही फार सुंदर भावना आहे. आपले बालपण कुठपर्यंत आहे? याचा कधीतरी विचार करायला हवा. जेव्हा आई जाते, तेव्हा बालपण संपते. ममत्वाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे. ही संधी ज्यांनी हेरली, त्यांनी महापुरुष घडविले. युद्ध जिंकण्यास शस्त्र लागतात आणि युग घडविण्यास आई लागते, असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हाॅल मध्ये ८ व्या माऊली पुरस्कार व प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ २ चे उपायुक्त मिलिंद मोहिते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, प्रतिष्ठानचे विक्रांत मोहिते, विराज मोहिते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांच्या मातोश्री हेमलता जगताप यांना माऊली पुरस्कार आणि रस्त्यावरच्या उपेक्षित मुलांना मायेची उब देणाऱ्या व शिक्षणाची वाट उजळविणाऱ्या दादाची शाळा या संस्थेला प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थापक अभिजीत पोखर्णिकर यांनी पुरस्कार स्विकारला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवनिर्वाचित नगरसेवक कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, स्वरदा बापट, राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मिलिंद मोहिते म्हणाले, आम्ही पोलीस म्हणून काम करताना समाजातील अंधाऱ्या बाजू बघत असतो. त्यावेळी समाजासाठी काम करणाऱ्या काही प्रकाशवाटा दिसल्या की त्या पणत्या तेवत रहाव्या, असे नेहमी वाटते. त्यामुळे उदय जगताप आणि दादाची शाळा सारख्या संस्थांचे कार्य असेच सुरु रहायला हवे.
उदय जगताप म्हणाले, समाजसेवा जिवंत ठेवण्यासाठी पुढच्या पिढीने काम करायला हवे. पुढच्या पिढीला दिशा देण्याचे काम पुण्यात मोहिते परिवाराचा हा ग्रुप करीत आहे. कोणतेही काम करताना संपूर्ण कुटुंब आपल्या सोबत असते, त्या सगळ्यांना हा पुरस्कार दिला गेला. नाती टिकून कुटुंब एकत्र येणे ही आज काळाची गरज आहे.
अभिजीत पोखर्णिकर म्हणाले, आज तरुणांकडे वेगळ्या दृष्टीने पहिले जाते. तरुण पिढी वाया जात आहे, असे अनेकांना वाटते. पण अनेक तरुण असे आहेत की जे चांगले काम करीत आहेत. तरुण मुले चांगले काम करू शकतात, फक्त त्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे. पुण्यात १४ हजार ४२७ मुले सिग्नलवर आहेत, हा २०१९ चा आकडा आहे. सन २०२६ मध्ये हा आकडा किती असेल, याचा अंदाज आपण घ्यायला हवा. आपण पुण्यात सिग्नलवर मुले पाहतो, त्यांना फक्त दया दाखवतो. पण निरंतन काळ टिकणारे आपण त्यांना द्यायला हवे. त्यांना शिक्षण व संस्कार द्यायला हवे. सध्या १७०० विद्यार्थ्यांसोबत आमची संस्था काम करीत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत मोहिते यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया निघोजाकर यांनी केले. कृतिका कोहिनकर मोहिते यांनी आभार मानले. सारिका खराडे, सचिन धुमाळ, श्वेता ढमाळ, ऍड. वृषाली जाधव मोहिते, शितल देशमुख, शिवाली मोहिते, श्रद्धा झंझाड, भाग्यश्री मोहिते, विशाल मोहिते, ऍड. सुखदा मोहिते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
फोटो ओळ : अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हाॅल मध्ये ८ व्या माऊली पुरस्कार व प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांच्या मातोश्री हेमलता जगताप यांना माऊली पुरस्कार आणि रस्त्यावरच्या उपेक्षित मुलांना मायेची उब देणाऱ्या व शिक्षणाची वाट उजळविणाऱ्या दादाची शाळा या संस्थेला प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
