‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक आणि जन्म सोहळा गुरुवारी (दि.२२)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन ; विनायक अवतार – गणेशजन्म सोहळा
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा यंदा देखील सुवर्णपाळण्यामध्ये दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर, नगरप्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
गणेश जन्म सोहळ्यानिमित्त बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी पहाटे ४ ते ६ यावेळेत मंदिरात भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी हे श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण करणार आहेत. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी भक्तांना यानिमित्ताने मिळणार आहे. गणेश जन्माच्या दिवशी गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे. याशिवाय गणेशसुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरु असणार आहेत. तसेच सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होईल.
मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगल आरती होईल. नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी ६ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी विविध कार्यक्रमांत सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
