January 19, 2026

वीर दमाजीराव गायकवाड यांना मानवंदनाश्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान तर्फे आयोजन

0
IMG-20260117-WA0028
Spread the love

पुणे : हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय… श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार की जय… पानिपत वीर अमर रहे… अशा गगनभेदी घोषणांनी श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला. सोम यदुवंशी बडोदा संस्थान संस्थापक, सेनाखासखेल, समशेर बहाद्दर, पानिपत वीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार व ज्ञात अज्ञात पानिपत वीरांना मानवंदना देण्यात आली. निमित्त होते, श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान कार्यक्षेत्र अखंड भारत, शिवशंभू प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ दावडी निमगाव यांच्या तर्फे गायकवाड दुर्ग दावडी निमगाव खेड येथे आयोजित पानिपत शौर्य दिन मानवंदना कार्यक्रमाचे.

सर्वप्रथम गायकवाड आडनावाचे जनक विजयराव गायकवाड यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. तदनंतर गायकवाड दुर्गावर गायकवाड घराण्याचा ध्वज फडकावण्यात आला. शिवरायांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन मानवंदनेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या तैलचित्राचे पुजन, गायकवाड सरकार तख्त व गायकवाड घराण्याचे पारंपरिक शस्त्र पट्टा याचे पुजन तसेच गायकवाड दुर्ग पूजन करण्यात आले. अशोक महाराज पवार यांच्या संघाने शिवकालीन मर्दानी युध्दकला सादर करुन शस्त्र मानवंदना दिली.

यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावातून आलेले गायकवाड स्वराज्यघराण्याचे वंशज, प्रतिष्ठानचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, उपाध्यक्ष अशोकआबा गायकवाड, सचिव प्रवीणभय्या गायकवाड, खजिनदार पंढरीनाथ गायकवाड, शिवव्याख्याते हभप बाजीराव महाराज बांगर, फत्तेसिंह गायकवाड, माजी सरपंच सुरेश डुंबरे, नितीन गायकवाड, रवी गायकवाड, गणेश गायकवाड, अंकुश गायकवाड, अजित गायकवाड, बाबासाहेब दिघे, विशाल गायकवाड, विलास गायकवाड, प्रभात गायकवाड, सुरजसिंह गायकवाड, रुपेश गायकवाड तसेच माता भगिनी, सरदारांचे वंशज, दावडी निमगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोघ वाणीने पानिपत रणसंग्राम जीवंत करणारे शिवव्याख्याते हभप बाजीराव महाराज बांगर म्हणाले, पानिपत रणसंग्रामात महाराष्ट्रातील ज्या घराण्यांनी त्वेषाने लढा दिला आणि पानिपत रणसंग्राम अजरामर केला त्यातील अग्रगण्य घराणे म्हणजे गायकवाड घराणे आणि त्यातील अनमोल रत्न पानिपत वीर दमाजीराव गायकवाड होत.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड म्हणाले, पानिपत रणभूमीवर वर राष्ट्ररक्षक मराठ्यांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाला समस्त भारतीयांनी वंदन करावे. पानिपत हा मराठ्यांचा पराभव नव्हे तर राष्ट्र रक्षणासाठी मराठ्यांनी गाजवलेला अतुलनीय पराक्रम आहे. राष्ट्रावर येणाऱ्या संकटाविरुध्द मतभेद विसरुन एकदिलाने लढणे हा राष्ट्ररक्षक मराठ्यांनी दिलेला धडा आजही भारतीयांना दिशादर्शक आहे. प्रतिष्ठान तर्फे २०१९ साली श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर पानिपत वीर दमाजीरावांना पहिली मानवंदना १४ जानेवारी २०२० ला देण्यात आली.मानवंदनेचे हे सलग ७ वे वर्ष आहे. मानवंदने व्यतिरिक्त प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती १९ फेब्रुवारीचा श्रीमंत गायकवाड सरकार स्वराज्यरथ सोहळा, दावडी येथे वसुबारस दीपोत्सव सोहळा, गायकवाड कुल संमेलन, गायकवाड दुर्ग स्वच्छता व संवर्धन ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्या येते.

प्रतिष्ठानचे सचिव चांदखेड गावाचे सुपुत्र प्रवीण दत्ताजी गायकवाड यांनी सोमयदुवंशी गायकवाड यांचे उगमस्थान, देवगिरी ते शिवनेरी, शिवनेरी ते दावडी व दावडी पासून विश्वभर पसरलेल्या गायकवाडांचा इतिहास कागदपत्रांच्या पुराव्यासहित मांडला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रवी गायकवाड आणि आभार प्रदर्शन फत्तेसिंह गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button