ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात माघ गणेश जन्मोत्सव आजपासून (दि.१९)ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; विविध कार्यक्रमांचे आयोज
पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात माघ गणेश जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन दि. १९ ते २३ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये मंदिरात दररोज सकाळी ७ पासून रात्री उशीरापर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्रीमन्महासाधू मोरया गोसावी पालखी सोहळा आगमन मंदिरात होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी दिली.
देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांसह खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार हे विश्वस्त मंडळ व सर्व ठकार पुजारी यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे. मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. त्यानंतर हा जन्मोत्सव मंदिरात होत असल्याने याला विशेष महत्व आहे.
दररोज सकाळी ७ वाजता डॉ.पं.प्रमोद गायकवाड आणि शिष्य यांचे सनई चौघडा वादन, सकाळी ९.३० वाजता श्रीं ना अभिषेक, दुपारी ४.३० वाजता महाडकर गुरुजी यांचे गणेशपुराण दररोज चारही दिवस होणार आहे. सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पं.शैलेश भागवत यांचे शहनाईवादन होणार आहे. मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्वरसंजीवन म्युझिकल प्रस्तुत भावभक्तीरंग हा कार्यक्रम, तर, बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भज-मन हा भावभक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गणेश जयंतीच्या दिवशी गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ८.१५ वाजता अथर्वशीर्ष पठ्ण व शंखनाद गजर, दुपारी १२.१५ ते १.३० यावेळेत श्री गणेशजन्म आरती सोहळा होणार असून रात्री ९.३० वाजता शेजारती व छबिना होईल. महिनाभर सुरु असलेल्या गणेशपुराण प्रवचनाची सांगता गणेशजयंतीच्या दिवशी होईल. शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्वरसाधना ग्रुप तर्फे अभंग, भावगीत, भक्तीगीत कार्यक्रम सादर होणार असून रात्री ९.३० ते ११ यावेळेत शेजारती व प्रसाद भजन होऊन उत्सवाची सांगता होईल. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
