सामान्य माणसाने आयुर्वेदावर विश्वास ठेवला पाहिजे – अभिनेते प्रशांत दामले
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे नरेंद्र भट्ट यांना महर्षि अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार वैद्य प्रदान
महाराष्ट्रातील १३ वैद्यांचा देखील पुरस्काराने गौरव
पुणे : आयुर्वेदात जितके चमत्कार आहेत, ते दुर्दैवाने आजही सामान्य माणसापर्यंत पोहोचलेले नाहीत. आयुर्वेदात अपार ताकद आहे. आयुर्वेदाला खरतरं कोणताही पर्याय नाही. केवळ भारतातच नव्हे, तर जगातही आयुर्वेद नंबर एक आहे. मात्र त्यासाठी सामान्य माणसाने आयुर्वेदावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो विश्वास कृतीत उतरवला पाहिजे, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे यंदाचा महर्षि अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार मुंबईचे वैद्य नरेंद्र भट्ट यांना प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, वैद्य विवेक साने, वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. मुख्य पुरस्काराचे स्वरुप ५१ हजार १ रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा ४१ वे वर्ष आहे. उल्लेखनीय कार्य करणा-या या वैद्यांची माहिती देणा-या स्मरणिकेचे प्रकाशन देखील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते झाले.
आयुर्वेद, वनस्पती शास्त्र, रसशास्त्र, चिकित्सा इत्यादी विविध आयामांमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या वैद्यांना वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे वैद्यकीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्य पुरस्कारासह वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार मुंबईचे वैद्य एच.बी.सिंग, वैद्य द.वा. शेंड्ये रसौषधी पुरस्कार नाशिकचे वैद्य संजय खेडेकर, वैद्य वि.म.गोगटे वनौषधी पुरस्कार पुण्याच्या वैद्या मिनल लाड, वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार मुंबईचे वैद्य अंकुश जाधव, वैद्य बाळशास्त्री लावगनकर पंचकर्म पुरस्कार जालन्याचे वैद्य प्रवीण बनमेरु, वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रुत पुरस्कार पुण्याचे वैद्य चंद्रकुमार देशमुख, वैद्य भा.गो. घाणेकर अध्यापन पुरस्कार पुण्याचे वैद्य उमेश टेकवडे, वैद्य मा.वा.कोल्हटकर संशोधन पुरस्कार मुंबईच्या वैद्या स्वप्ना कुलकर्णी, वैद्या लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्या पुरस्कार पुण्याच्या वैद्या रेणुका कुलकर्णी, वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार पुण्याचे वैद्य गणेश परदेशी, पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पेणच्या वैद्या शिल्पा ठाकूर आणि डॉ.वा.द.वर्तक वनमित्र पुरस्कार डोंबिवलीचे दीपक जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरुप २१ हजार १ रुपये, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व श्रीफळ असे होते.
प्रशांत दामले म्हणाले, माझ्या नाटकाच्या कामामुळे माझा दिनक्रम निसर्गाविरोधी आहे. याचा परिणाम शरीरावर दिसू लागला होता परंतु माझ्या बाबतीत २००८ पासून आजपर्यंत पित्ताचा त्रास मला झाला नाही, कारण त्या काळापासून मी सातत्याने आयुर्वेदाचे पालन करत आहे. आयुर्वेदात संयम फार महत्त्वाचा आहे; तात्काळ परिणामांची अपेक्षा न करता सातत्य ठेवावे लागते. आज मेडिकल कॉलेजसाठी ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो. डॉक्टर झाल्यानंतर तो खर्च वसूल करण्याची मानसिकता तयार होते. त्यामुळे आपण हाॅस्पिटलच्या दृष्टचक्रात अडकतो त्यामुळे स्वतःची तब्येत स्वतः सांभाळणे गरजेचे आहे. आयुर्वेद आपल्याला स्वतःच्या शरीराची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकतो.
वैद्य नरेंद्र भट्ट म्हणाले, आयुर्वेद पुनरुज्जीवित करायचा असेल, तर निसर्गाकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही. आयुर्वेद सांगतो की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्येक प्रकृती स्वतंत्र आहे. त्यामुळे एकसारख्या उपचारांची चौकट आयुर्वेदाला मान्य नाही. आयुर्वेद वाचवायचा असेल, तर आयुर्वेदाचे रुग्णही डॉक्टर झाले पाहिजेत. म्हणजेच समाजाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. आपली तंत्रे, आपली रचना, आपली संस्कृती आणि आपली शिक्षणपद्धती या सर्वांनी डॉक्टरासारखा विचार केला पाहिजे. जर आपण सर्वांगीण आणि समग्र दृष्टीकोन ठेवला, तर एआय चा उपयोग आयुर्वेद आणि मानवतेच्या सेवेसाठी निश्चितच करता येईल. आयुर्वेद क्षेत्रातही गुंतवणूक अपरिहार्य आहे आणि ती गुंतवणूक विश्वास आणि विकास या दोन पातळ्यांवर असली पाहिजे, कारण शेवटी ही गुंतवणूक रुग्णासाठी असते, असेही त्यांनी सांगितले.
वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले म्हणाले, आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी परशुराम वैद्य खडीवाले उर्फ दादांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. आयुर्वेदातील विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या वैद्य, संशोधक तसेच औषधी वनस्पतीप्रेमी व्यक्तींच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा, या उद्देशाने संस्थेच्या वतीने सन १९८५ पासून वैद्यकीय पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. गेल्या ४० वर्षांच्या कालावधीत ४५० हून अधिक मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार समितीच्या कार्यात वैद्य एकनाथ कुलकर्णी, वैद्या मीरा औरंगाबादकर, वैद्य विनय वेलणकर, वैद्य शिवानंद तोंडे, तसेच वैद्य खडीवाले वैद्य संशोधन संस्थेचे विश्वस्त वैद्य विनायक वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, वैद्य निखिल विनायक वैद्य खडीवाले, जयश्री टाव्हरे, वैद्य अनंत निमकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. नारायणी कुलकर्णी यांनी पसायदान म्हटले. रोहित जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता विनायक वैद्य यांनी आभार मानले.
