घोषवादनातून स्वामी विवेकानंदांना विद्यार्थ्यांनी केले अभिवादनअखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स.प.महाविद्यालय चौकात आयोजन
पुणे : उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका असा संदेश देणा-या तसेच भारताच्या युवा शक्तीचे प्रतीक असलेल्या स्वामी विवेकानंद यांना विद्याथीर्नींनी घोष वादनातून अभिवादन केले. घोषवाद्यांवरील देशभक्तीपर गीतांच्या वादनाने आणि भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स.प.महाविद्यालय चौकात डी.ई.एस. प्रशाला, रेणुका स्वरुप प्रशालेतील विद्याथीर्नींनी घोषवादन करुन स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. यावेळी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, अध्यक्ष एस.आर. कुलकर्णी, उपाध्यक्ष संध्या भिडे आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूणार्कृती पुतळ्याला भूषण गोखले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
भूषण गोखले म्हणाले, स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी, तत्त्वज्ञ आणि रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. ज्यांनी वेदांत आणि योगाचा पाश्चात्य जगाशी परिचय करून दिला. त्यांनी शिकागो येथील भाषणातून भारतीय संस्कृतीचा गौरव केला आणि रामकृष्ण मिशनची स्थापना करून शिक्षण व समाजसेवेद्वारे राष्ट्राच्या अस्मितेचे जतन केले, ज्यामुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले. तरुण पिढीसमोर स्वामी विवेकानंद यांचा आदर्श आहे. उठा, जागे व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी दिला.
सूर्यकांत पाठक म्हणाले, सन १९७४ ला ग्राहक पंचायत सुरु झाली. स्वामी विवेकानंदांना आदर्श मानून पंचायतीचे कार्य सुरु झाले. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम ग्राहक पंचायतीच्या शाखांमध्ये देशभर साजरा केला जातो. समाज बदलण्यासाठी तरुण पिढी कार्य करु शकते. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि समाजासाठी चांगले काहीतरी करण्याचा संकल्प करा, असा संदेश कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
- फोटो ओळ : अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स.प.महाविद्यालय चौकात रेणुका स्वरूप, डी.ई.एस. प्रशालेतील विद्याथीर्नींनी घोषवादन करुन स्वामी विवेकानंद अभिवादन केले.
