देशी गाईंवरील पुस्तकांचे एकाचवेळी प्रकाशन करीत जागतिक विक्रमश्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताहाचे आयोजन ; एकाच वेळी उपस्थित सर्व गोभक्तांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने देशी गायींबाबत माहिती देणाऱ्या विविध पुस्तकांचे एकाच वेळी उपस्थित सर्व गोभक्तांच्या हस्ते प्रकाशन करून जागतिक विक्रम नोंदविला गेला. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद करण्यात आली आहे. गौ-कथा सप्ताह अंतर्गत “भारतीय कामधेनू” हे पुस्तक सभागृहात उपस्थित सर्व गो-भक्तांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. देशीगायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करणे आणि भारतीय सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपणे हा उपक्रमाचा उद्देश होता.
श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच गौ-कथा सप्ताह आयोजित करण्यात आला. वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे आयोजित या सोहळ्यात पुस्तक समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमुर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, डॉ. प्रसाद खंडागळे, आदी उपस्थित होते. तसेच यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे यांचे देशी गायींवर संशोधनातील समर्पण आणि मानवकल्याणासाठीच्या योगदान याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्यावतीने गौरव करण्यात आला.
गुरुदास देशमुख महाराज म्हणाले, जुन्या पिढीला गायीचे महत्व माहिती आहेच, परंतु नव्या पिढीला देखील गायीचे महत्व कळावे यासाठी देशी गायींचे महत्व सांगणाऱ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. हे संस्थेच्यावतीने हजारो शाळांमध्ये याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच देशी गायींची माहिती सिमीत न राहता जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, पंचगौव्य हे शुद्धीकरण, आयुर्वेदीय उपचार, पूजाविधी तसेच काही पारंपरिक औषधांमध्ये देखील वापरले जातात.आज देशी गायींवर म्हणजे पंचगौव्यवर अनेक संशोधन होत आहेत. त्याद्वारे विविध आजार बरे करण्याचे तसेच विविध औषधांची देखील निर्मिती केली जात आहे. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
फोटो ओळ – श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने देशी गायींबाबत माहिती देणाऱ्या विविध पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे आयोजित कार्यक्रमात करून जागतिक विक्रम नोंदविला गेला. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद करण्यात आली.
