एकबोटे, राजकुमार चोरडिया यांना जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे पुरस्कारजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे होणार आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूटस चे उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नॅकचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. संजय उपाध्ये उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांनी केले आहे.
कार्यक्रमात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ अशी ओळख असलेले डॉ. अभिजीत सोनवणे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी, महेश सहकारी बँकेचे अध्यक्ष जुगल किशोर पुंगलिया यांना सहकार क्षेत्रातील योगदानासाठी, तसेच प्रवीण मसालेवालेचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
