बांधकाम क्षेत्रात संशोधन व इनोव्हेशनवर भर द्यायला हवा
- इंजि. रणजित नाईकनवरे यांचे प्रतिपादन; ‘कन्स्ट्रो २०२६’, चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे: “स्थापत्य अभियंता झाल्यानंतर आपण नोकरी व्यवसायाच्या मागे लागतो आणि ज्ञानार्जन थांबवतो. परंतु, बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत असून, त्यामध्ये नाविन्यता पाहायला मिळत नाही. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी करिअरबरोबरच संशोधन व इनोव्हेशन करण्यावर भर द्यायला हवा. बांधकाम क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी प्रयत्नशील राहावे,” असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष इंजि. रणजित नाईकनवरे यांनी केले.
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कन्स्ट्रो २०२६’ या चार दिवसीय विसाव्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात रणजित नाईकनवरे बोलत होते. मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात ११ जानेवारी २०२६ पर्यंत हे प्रदर्शन सुरु असणार आहे.
नवी दिल्ली येथील कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्कि. अभय पुरोहित, कन्स्ट्रो प्रदर्शनाचे चेअरमन इंजि. जयदीप राजे, ‘पीसीईआरएफ’चे अध्यक्ष इंजि. नरेंद्र कोठारी, सचिव आर्कि. शिरीष केंभावी, जयंत इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी ‘कन्स्ट्रो २०२६’च्या सोव्हेनिअरचे व डायरीचे प्रकाशन करण्यात आले. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
इंजि. रणजित नाईकनवरे म्हणाले, “कन्स्ट्रोसारख्या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्रात होणारे नवनवे बदल, वापरण्यात येणारे प्रगत तंत्रज्ञान समजून घेता येते. स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी केवळ नोकरीसाठी नाही, तर या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण, विकासाभिमुख कार्य करण्यासाठी आहे, हे आपण ध्यानात घ्यावे. शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन व विकास आणि इनोव्हेशन या गोष्टींचा अंतर्भाव बांधकाम क्षेत्रात होण्यासाठी अशी प्रदर्शने महत्वाची ठरतात. चारशेहून अधिक स्टॉल्स येथे असून, प्रत्येकाकडे काहीतरी नवीन पाहायला मिळाल्याचे समाधान आहे.”
आर्कि. अभय पुरोहित म्हणाले, “बांधकाम आणि स्थापत्य क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असला, तरी या क्षेत्रात शाश्वतता, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक नैतिकता यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल डिझाइन टूल्स आणि प्रगत बांधकाम साहित्य यांचा वापर करून प्रकल्पांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा. नावीन्यपूर्ण विचार, सतत शिकण्याची वृत्ती आणि सामाजिक जाणीव या मूल्यांवरच भविष्यातील स्थापत्य उभे राहणार आहे.”
प्रास्ताविकात जयदीप राजे यांनी ‘कन्स्ट्रो २०२६’ विषयी सविस्तर माहिती सांगितली. बांधकाम क्षेत्रातील हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्वाचे मोठे प्रदर्शन आहे. ज्यामध्ये यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य, आधुनिक पद्धती व प्रगत तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांचे संशोधन व इनोव्हेशन यासह विविध प्रकल्पांना एकत्रित पाहण्याची संधी असते. चार दिवसांत हजारो नागरिक, विद्यार्थी, बांधकाम क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ या प्रदर्शनाला भेट देतात, असे त्यांनी नमूद केले. इंजि. मनोज देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. इंजि. नरेंद्र कोठारी यांनी स्वागतपर भाषण केले. आर्कि. शिरीष केंभावी यांनी आभार मानले.
आधुनिक तंत्रज्ञान व गुणवत्तेला प्राधान्य हवे: गडकरी
देशाच्या पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना स्वीकारणे अत्यावश्यक आहे. रस्ते, पूल, स्मार्ट शहरे आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा या देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा आहेत. खर्च कमी करून टिकाऊ, दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक बांधकामावर भर देणे गरजेचे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वेळ, खर्च आणि गुणवत्ता या तिन्ही बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा साधता येईल. बांधकाम क्षेत्रात नव्या साहित्याचा वापर, कचऱ्यापासून इंधन, पुनर्वापरक्षम संसाधने आणि हरित ऊर्जेच्या उपाययोजनांकडे वळावे. बांधकाम क्षेत्रातील उद्योग, अभियंते आणि उद्योजकांनी संशोधन व इनोव्हेशनला चालना द्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Photo caption:
२५२१- मोशी: पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कन्स्ट्रो २०२६’ या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात डावीकडून सचिव आर्कि. शिरीष केंभावी, इंजि. नरेंद्र कोठारी, इंजि. रणजित नाईकनवरे, इंजि. जयदीप राजे, आर्कि. अभय पुरोहित, जयंत इनामदार आदी.
