January 19, 2026

अजित पवारांच्या सत्ता काळातमेट्रोचे काम एक इंचही पुढे गेले नाही

0
IMG-20260108-WA0031
Spread the love

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार

पुणे – प्रतिनिधी,
दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर २००१ पासून पुण्यात मेट्रो आणण्याचे प्रयत्न २०१४ पर्यंत फक्त चर्चेच्याच पातळीवर राहिले. २००१ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना मेट्रोचे काम इंचभरही पुढे गेले नाही. त्यामुळे धादांत खोटी विधाने करून काँग्रेस व राष्ट्रवादीने कधीच न केलेल्या मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी केली.

तसेच अजित पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर विश्वास नाही का? असा सवालही मोहोळ यांनी उपस्थित केला.

मोहोळ यांनी गुरुवारी पुणे मेट्रोतून प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

वाजपेयींनी दिली मेट्रो प्रकल्पांना चालना

सन १९८४ मधील कोलकाता मेट्रोनंतर १४ वर्ष देशात मेट्रोचा विस्तारच झाला नाही. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मेट्रो प्रकल्पांना चालना दिली. दिल्ली मेट्रोचे भूमीपूजन आणि लोकार्पणही वाजपेयीच पंतप्रधानपदी असताना झाले. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर बेंगळुरू व पुण्यात मेट्रो आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, राज्य सरकार व पुणे तसेच पिंपरी चिंचवडमधील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे ही बाब चर्चेपुरतीच मर्यादित राहिली,असे मोहोळ म्हणाले.

विलंबामुळे खर्चात झाली वाढ

‘मेट्रो मॅन’ व दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन यांनी २००९ मध्ये पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुणे महापालिकेत सादर केला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने जून २०१० मध्ये केवळ वनाझ ते रामवाडी या एकाच मार्गिकेला मान्यता दिली. तेव्हा अजित पवार यांच्या कारभाऱ्यांची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या हद्दीतील मेट्रोचे अंतर अत्यंत कमी असल्याचे सांगत मेट्रोसाठी निधी देण्यास नकार दिला. परिणामी राज्य सरकारने २०१२ मध्ये एकाच मार्गिकेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. एकाच मार्गाला मंजुरी देता येत नसल्याचे सांगत केंद्राने या प्रस्ताव परत पाठवला. अखेर २०१३ मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड दोन्ही पालिकांनी पुणे मेट्रोच्या एकत्रित प्रस्तावाला मान्यता दिली. परंतु, त्यामुळे खर्च आठ हजार कोटींवरून दहा हजार १८३ कोटींवर पोहोचला.

अजित पवारांमुळेच रखडली मेट्रो

दरम्यानच्या काळात काही पर्यावरणप्रेमींनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेत उन्नतऐवजी संपूर्ण मेट्रो भुयारीच असावी, असा आग्रह धरला. त्यांचे ऐकत राष्ट्रवादी काँग्रेसने २०१२ च्या पुणे महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पुणे मेट्रो भुयारीच असेल, असे आश्वासन दिले. मात्र, भुयारी मेट्रोसाठी उन्नतपेक्षा पाच पट खर्च येणार असल्याचे लक्षात आल्याने पवार यांनी संमिश्र मेट्रोला मान्यता दिली. अखेरीस फेब्रुवारी २०१४ मध्ये केंद्र सरकारने मेट्रो प्रकल्पाला तत्वत: मान्यता देत काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या. मात्र, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्यावर कार्यवाहीच केली नाही. ‘यूपीए’प्रणित केंद्र सरकार व राज्यातील सरकारचा तसेच पुण्यातील सुरेश कलमाडी आणि पिंपरी चिंचवडमधील अजित पवार यांच्या अधिपत्याखालील महापालिकांच्या वेळकाढूपणामुळेच पुण्याची मेट्रो प्रदीर्घकाळ रखडली.

मागून येऊन या शहरांची आघाडी

पुण्याबरोबरच देशातील आठ शहरात मेट्रो प्रकल्पाची चर्चा सुरू झााली. मात्र, पुण्याची मेट्रो चर्चेत अडकली. आणि इतर शहरात मेट्रो प्रत्यक्षात धावू लागली.
बेंगळुरू (२०११)
गुडगाव (२०१३)
मुंबई (२०१४)
चेन्नई (२०१५)
जयपूर (२०१५)
हैदराबाद (२०१७)
कोची (२०१७)

लखनऊ (२०१७)

हो हे आम्हीच केले

  • सन २०१४ नंतर केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पांना गती दिली.
  • ३० सप्टेंबर २०१४ रोजी राज्य सरकारने पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या सुमारे १६ किमीच्या पहिल्या मेट्रोला मान्यता दिली.
  • पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्र सरकारने मान्यता सात डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली.
  • २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे भूमीपूजन केले.
  • ६ मार्च २०२२ रोजी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
  • हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला फेब्रुवारी २०१८ मध्ये मान्यता मिळून नोव्हेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींनी भूमीपूजन केले. मात्र, राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने याकडे दुर्लक्ष झाले. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर गती मिळालेला हा प्रकल्प आता पूर्णत्वास जात आहे.

असा असेल मेट्रोविस्तार

  • स्वारगेट-कात्रज, वनाज- चांदणी चौक, रामवाडी-वाघोली, पीसीएमसी- भक्ती शक्ती हे मेट्रोमार्ग प्रगतीपथावर
  • खडकवासला – खराडी, नळ स्टॉप – वारजे – माणिक बाग या मेट्रोमार्गांना मंजुरी
  • हडपसर – लोणी काळभोर, हडपसर – सासवड रोड मार्गिका प्रस्तावित

कोट

पुणे मेट्रोला खऱ्या अर्थाने फक्त भारतीय जनता पक्षानेच गती दिली. सध्या ३१ किमी मेट्रोतून दररोज दोन लाख पुणेकर प्रवास करतात. या प्रवाशांना विचारले तर ते निर्विवादपणे मोदी यांनीच मेट्रो सुरू केल्याचे सांगतील. खोटे बोलून पुणेकरांची दिशाभूल करण्यापेक्षा मेट्रो प्रकल्पात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग अजित पवारांनी दाखवून द्यावा. निवडणुकीत सांगण्यासारखे काहीच नसल्याने अजित पवार निराधार विधाने करीत आहेत.

मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button