दिनदर्शिकेला विज्ञानाचा ठोस आधारजगद्गुरु श्री तुकोबाराय विश्व कल्याण मिशनचे संस्थापक डॉ. श्री. चेतनानंद महाराज पुणेकर ; विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
पुणे: हिंदू दिनदर्शिका ही चंद्र, नक्षत्र, तिथी, योग आणि यान यांवर आधारित आहे. याला विज्ञानाचा ठोस आधार आहे. भारतीय परंपरेतील ऋषींनी वेद–उपनिषदांमधील संस्कृतीचा अभ्यास करून काळासाठी अचूक कालखंड निश्चिती केली आहे. अनेक महत्त्वाचे शोध त्यांनी आपल्या परंपरेतून पुढे आणले आहेत. आपली शास्त्रे ही सनातन, पुरातन आणि भक्कम आहेत. प्रत्येक वेळी पंचांगाने आपली अचूकता सिद्ध केली आहे. असे मत जगद्गुरु कृपांकित डॉ. श्री. चेतनानंद महाराज पुणेकर यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रांतमंत्री किशोर चव्हाण, रा. स्व. संघ, प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे उपस्थित होते.
हेमंत हरहरे म्हणाले, दिनदर्शिकेतील सुट्टीचे दिवस विश्व हिंदू परिषदेचे काम करण्यासाठी वापरावेत. विश्व हिंदू परिषदेसाठी सर्व आयामांमध्ये कार्यकर्ते मिळवणे व त्यांची संख्या वाढवणे, हा यावर्षीचा उद्देश आहे. संघटनेच्या कामावर निष्ठा आणि कार्यपद्धतीवर विश्वास असणे आवश्यक आहे. सामाजिक बदल मनामनात घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
किशोर चव्हाण म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येत आहे. दिनदर्शिकेमध्ये हिंदू सण ,विस्तृत पंचांग तसेच परिषदेच्या वार्षिक उत्सवांची माहिती तसेच विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. आषाढी आरोग्य सेवा तसेच यंदापासून चालू करण्यात आलेले वारी सजगता अभियान तसेच प्लास्टिकमुक्त अभियानबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परिषदेचे हितचिंतक यांच्या घरात दिनदर्शिका आवर्जून पोहचवली जाते. समाजापर्यंत अधिकाधिक उपक्रम व कार्यांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास दिनदर्शिका निर्माण समितीचे धनाजी शिंदे, अशोक येलमार , निखिल कुलकर्णी, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, अतुल सराफ, जिल्हा मंत्री विजय कांबळे , नाना क्षीरसागर , राजेंद्र शेवाळे,शरद दुबे ,शार्दुल ठाकूर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा मंत्री शुभम मुळुक यांनी केले.
फोटो ओळ – विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मान्यवर.
