January 19, 2026

दीदी या मंगेशकर कुटुंबाच्या आई होत्याआदिनाथ मंगेशकर ; लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा ; माय होम इंडिया आणि एमआयटी डब्ल्यूपीयु स्कूल ऑफ लिबरल आर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

0
IMG-20251222-WA0017
Spread the love

पुणे : भारतरत्न लता मंगेशकर म्हणजेच आपल्या लता दीदी. त्यांच्याबद्दल बोलणे अशक्य आहे. आमचे मंगेशकर कुटुंब एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्याबद्दल अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. आजही आमचा दिवस त्यांच्या गाण्याने सुरु होतो आणि त्यांच्या गाण्याने संपतो. लता दीदी या मंगेशकर कुटुंबाच्या आई होत्या, असे सांगत पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या आठवणी जागवल्या.

माय होम इंडिया आणि एमआयटी डब्ल्यूपीयु स्कूल ऑफ लिबरल आर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने लता मंगेशकर पुरस्कार सोहळा २०२५ तसेच लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीताला अभिवादन करणारी ‘सुनो सजना’ ही विशेष स्वरमैफल कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयु कॅम्पस स्वामी विवेकानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ‘ गप्पाष्टक’ कार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून एमआयटी-डब्ल्यूपीयू चे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, डॉ. विशाल घुले, जनसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा, यांसह माय होम इंडियाच्या उपाध्यक्षा पौर्णिमा मेहता, विश्वस्त आनंद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभय थिटे आदी उपस्थित होते. या सोहळ्यातील विशेष क्षण म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दूरध्वनीद्वारे रसिकांशी संवाद साधला.

लता मंगेशकर पुरस्कार २०२५ अंतर्गत डॉ. मृदुला दाढे, डॉ. शंतनु गोखले, विजय केळकर (अण्णा), जीवन धर्माधिकारी आणि श्रीकांत शिर्के यांना सन्मानित करण्यात आले. रुपये २१ हजार, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे ४ थे वर्ष होते. यावेळी ‘सुनो सजना’ ही विशेष स्वरमैफल आयोजित करण्यात आली होती. लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांनी नटलेली ही स्वरसंध्या रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली.

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, माणसाची चांगली सवय ही परंपरा होते, त्याचप्रमाणे ती संपूर्ण देशाला लागली की संस्कृती होते. संगीताच्या समृद्ध परंपरेची मंगेशकर कुटुंबाची संस्कृती ही आपल्या देशाला लाभली आहे. विविध कार्यक्रमांचे निवेदन करताना मंगेशकर कुटुंबाशी निगडीत अनेक आठवणी माझ्याकडे देखील असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मृदुला दाढे, विजय केळकर यांनी गीतांच्या सादरीकरणाद्वारे मनोगत व्यक्त केले. प्रशांत लळीत यांचे संगीत संयोजन होते तर मंदार खराडे यांनी सूत्रसंचालन केले.

  • फोटो ओळ : माय होम इंडिया आणि एमआयटी डब्ल्यूपीयु स्कूल ऑफ लिबरल आर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने लता मंगेशकर पुरस्कार सोहळा २०२५ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयु कॅम्पस स्वामी विवेकानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व सन्मानार्थी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button