देवदासी महिलांसोबत ‘आपुलकीची भाऊबीज’
जनता वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून आयोजन
पुणे : जनता वेल्फेअर सोसायटी तर्फे सामाजिक बांधिलकी जपत आपुलकीची भाऊबीज हा कार्यक्रम घेतला जात आहे. हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक उपक्रम नाही, तर समाजाची गरज आहे. अशा सामाजिक कार्यक्रमांमधून एक प्रकारे सामाजिक सलोखा जपला जाणार आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भाग्यश्री साठे यांनी व्यक्त केले.
जनता वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून देवदासी महिलांसाठी आयोजित आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील नामदेव शिंपी समाज कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी स्नेहालय संस्थेच्या विश्वस्त मानसी चंदगडकर, जनता बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, जनता वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
मानसी चंदगडकर म्हणाल्या, देवदासी महिलांना व्यवसायामधून बाहेर पडण्यासाठी स्नेहालय ही संस्था मदत करते. स्नेहालय केवळ एक सामाजिक उपक्रम नाही, तर समाजामध्ये वाट चुकलेल्यांना दिशा दाखवणारी एक संस्था आहे. देवदासी महिलांची पुढची पिढी या व्यवसायामध्ये येऊ नये आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी स्नेहालय ही संस्था गेल्या ३६ वर्षांपासून काम करत आहे.
अलका पेटकर म्हणाल्या, समाजामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम राबविल्यामुळे बंधुता आणि सलोख्याचा दिवा प्रत्येक मनामध्ये पेटत राहील, आणि त्यातूनच समाजामध्ये बंधुता निर्माण होईल. यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अत्यंत जास्त आहे.
रवींद्र हेजीब म्हणाले, आपुलकीची भाऊबीज हा कार्यक्रम समाजाची गरज आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनता बँक एक प्रकारे समाजामध्ये खारीचा वाटा उचलत आहे. आम्ही समाजाच्या प्रगतीसाठी थोडाफार हातभार लावत आहोत, याचे आम्हाला निश्चितच समाधान आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, जनता सहकारी बँक ही केवळ आर्थिक उलाढालीचे काम करत नाही, तर बँकेतील सेवकांची असलेली जनता वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या ठिकाणी समस्या किंवा आपत्ती आहे, त्या ठिकाणी बँकेतील सेवक मदतीच्या रूपाने धावून जातात. समाजातील अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाचा दिवा बनवण्याचे काम जनता वेल्फेअर सोसायटी करत आहे.
