नूमवि कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळा उत्साहात साजरा
‘सुवर्णस्मृतीगंध’ स्मरणिकेचे प्रकाशन : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी योगदानाचे आवाहन
पुणे : नूमवि कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या प्रवासावर आधारित ‘सुवर्णस्मृतीगंध’ स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी योगदानाचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून १९७७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी डॉ. रामचंद्र साठये उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके विराजमान होते. यावेळी नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सोहनलाल जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या भव्य समारंभाला माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक, तसेच नियामक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विष्णुशास्त्री चिपळूणकर व नूमवि प्रशालेचे संस्थापक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गणेश वंदना आणि आजी विद्यार्थ्यांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण रंगले.
उषा जांभळे यांनी सुवर्णमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना महाविद्यालयाच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारा माहितीपट सादर केला. डॉ. माधुरी भामरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच माजी शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे डॉ. साठये यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात ॲड. फडके यांनी बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी सक्षम नेतृत्व विकसित करावे आणि शिक्षकांनी त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन सोमनाथ जायदे आणि अमृता हिर्लेकर यांनी प्रभावीपणे केले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा समिती अध्यक्ष पराग ठाकूर, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, तसेच उपप्राचार्य राजश्री हेंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी बाजीराव शेरमाळे यांनी आभारप्रदर्शन केले आणि भारती कपटकर यांच्या सुश्राव्य पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
