पारंपारिक वेशात ज्येष्ठांनी गाजवला फॅशन रॅम्पउन्नती प्रस्तुत ज्येष्ठ नागरिक श्रावण किंग क्वीन फॅशन शो आणि प्रदर्शनाचे आयोजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री यांचा पारंपारिक वेशात सहभाग
पुणे : पांढरे केस…चेहऱ्यावर हसू… तरुणाईलाही लाजवणारा उत्साह, स्टाइल आणि फॅशन रॅम्पवर आत्मविश्वासाने वावरणारे ज्येष्ठ नागरिक…वय हा केवळ एक आकडा आहे, हे सिद्ध करत ज्येष्ठ नागरिकांनी रंगीबेरंगी कपडे आणि आत्मविश्वासाच्या पाऊलवाटांवर फॅशन रॅम्प गाजवला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री देखील पारंपारिक वेशात फॅशन शो मध्ये सहभागी झाल्या होत्या.
उन्नती’ प्रस्तुत श्रावण किंग आणि क्वीन फॅशन शो व महिलांचे प्रदर्शन कोथरूड येथील पुण्याई सभागृहात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेस्टिनेशन कोवर्किंगचे डायरेक्टर मंदार देवगांवकर, भाजप कोथरूड दक्षिण चे अध्यक्ष कुलदीप सावळेकर, डॉ. संदीप बुटला हे मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात खाद्यपदार्थ, मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, दागिने, कपडे, शोभेच्या वस्तू आदींचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यावेळी फॅशन शोमध्ये पारंपरिक वेशात सजलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेत आपले कलागुण सादर केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महिलांना व्यवसाय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. त्याचबरोबर उतारवयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि परंपरेचे जतन करणारा फॅशन शो ही संकल्पना अत्यंत सुंदर आहे. अनेक वेळा राजकारणी, उद्योजक आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. अशा उपक्रमांमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेत त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याचे काम ‘उन्नती’ संस्थेने केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
अमृता देवगांवकर म्हणाल्या, महिलांना व्यवसायातून रोजगाराची संधी मिळावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि ज्येष्ठांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्यावतीने अनेक उपक्रम राबवले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. फॅशन शो चे परीक्षण कुणाल फडके व हर्षदा टिल्लू यांनी केले. गार्गी कुलकर्णी यांनी निवेदन केले.
फोटो ओळ : ‘उन्नती’ प्रस्तुत ज्येष्ठ नागरिक श्रावण किंग आणि क्वीन फॅशन शो व महिलांचे प्रदर्शन कोथरूड येथील पुण्याई सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी फॅशन रॅम्पवर सादरीकरण करताना सहभागी ज्येष्ठ नागरिक व प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला.
