January 20, 2026

आज खरा इतिहास समोर आणण्यास संशोधक घाबरतातपुरातत्त्व आणि संग्रहालये महाराष्ट्र राज्याचे संचालक डाॅ. तेजस गर्गे यांचे मत ; इंद्रायणी साहित्य द्वारा प्रकाशित, संदीप परांजपे संपादित ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या, जिल्हा सातारा आणि कोल्हापूर या पुस्तकाचे प्रकाशन

0
IMG-20250804-WA0038
Spread the love


पुणे – आज समाजमाध्यमांवर विषय भडकपणे मांडले जातात आणि त्यामुळे आपण सत्यापासून दूर जात आहोत. नागरिकांपर्यंत खरा इतिहास पोहोचवण्यासाठी संशोधकांनी सुवर्णमध्य शोधणे आवश्यक आहे. मात्र आज समाज अस्मिता प्रकर्षाने पुढे येत असल्यामुळे त्याचाही संशोधकांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक संशोधक खरा इतिहास मांडण्यास घाबरतात. अशा परिस्थितीत त्यांनी इतिहास मांडण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व आणि संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी साहित्य द्वारा प्रकाशित, संदीप परांजपे संपादित ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या, जिल्हा सातारा आणि कोल्हापूर या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ भारत इतिहास संशोधन मंडळ येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ गिर्यारोहक वसंत लिमये, पुरातत्त्व संशोधक डॉ. सचिन जोशी, संदीप परांजपे, अरुणकुमार बाभूळगावकर उपस्थित होते.

डॉ. तेजस गर्गे म्हणाले, संशोधक म्हणून आपण अनेकदा एकटे असतो. परंतु, संशोधकांनी एकत्र येऊन काम केल्यास तयार होणारा संदर्भग्रंथ हा बहुविषयक स्वरूपाचा असेल. आपला इतिहास इंग्रजी भाषेत फारच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणूनच मराठीबरोबरच इंग्रजीतही इतिहासाची नोंद व्हायला हवी, तेव्हाच तो जागतिक पातळीवर पोहोचू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सचिन जोशी म्हणाले, अनेक सर्वसामान्य लोक किल्ल्यांवर जातात, पण तिथे नेमके काय पाहायचे आणि किल्ला कसा पाहावा याची माहिती त्यांना नसते. आपल्याला किल्ल्यांचा इतिहास संपूर्ण माहिती नसल्यामुळे त्याचा योग्य संदर्भ लक्षात येत नाही. मात्र, किल्ल्यावर जाण्यापूर्वी त्याचा इतिहास वाचून गेल्यास, तेथे अनेक ऐतिहासिक गोष्टींचे संदर्भ समजू शकतात. त्याचबरोबर गडकिल्ल्यांवर पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. वसंत लिमये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संदिप परांजपे यांनी पुस्तकाची माहिती दिली आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य, अभ्यासकांना कसा होईल हे सांगितले. चिंतामणी केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मुग्धा कोपर्डेकर यांनी आभार मानले.

फोटो ओळ – इंद्रायणी साहित्य द्वारा प्रकाशित, संदीप परांजपे संपादित ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या, जिल्हा सातारा आणि कोल्हापूर या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ भारत इतिहास संशोधन मंडळ येथे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button