-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी -शास्त्र, संहिता आणि तर्क ही चिकित्सेची साधनेज्येष्ठ वैद्य महेश ठाकूर ; कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ वैद्य विभव येवलेकर यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार प्रदान
पुणे : जेव्हा आपण वैद्य म्हणून औषधांचा अभ्यास करतो, तेव्हा त्यामागे काय पार्श्वभूमी असावी, हे पहायला हवे. औषधी कल्प कसे रचले असतील, हे अभ्यासायला हवे. प्रत्येक वैद्याला औषध निर्मितीचे ज्ञान असणे गरजेचे असून शास्त्र, संहिता आणि तर्क ही चिकित्सेची साधने आहेत, असे मत डोंबिवलीचे ज्येष्ठ नामांकित वैद्य महेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात करण्यात आले. यावेळी नाशिकचे वैद्य विभव येवलेकर यांना यंदाचा यशस्वी युवा वैद्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर वैद्य लक्ष्मण लावगनकर, वैद्य माधव भागवत आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुस्तक, दहा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा पाचवे वर्ष आहे.
वैद्य महेश ठाकूर म्हणाले, कोणताही रुग्ण बरा झाला, म्हणजे वैद्य श्रेष्ठ नाही. तर, रुग्णाला दिलेली औषध योजना आणि उपचार कशा पद्धतीने वापरले, हे सांगता येणे म्हणजे उत्तम वैद्य. प्रत्येक औषधाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे वैद्यांनी आवश्यक असल्याचे सांगत ‘आयुर्वेदीय औषधी कल्प…संरचना व सिद्धांत’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
पुरस्काराला उत्तर देताना वैद्य विभव येवलेकर म्हणाले, सध्या सर्वत्र वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. त्यामध्ये आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती टिकून राहते, ती गुरुपरंपरेमुळे. गुरुपरंपरेकरीता समर्पण गरजेचे आहे. तंत्रज्ञानासह अनेक बाबींमध्ये बदल होत आहेत. त्या वातावरणात आयुर्वेदाला पुढे घेऊन जाण्याचे आव्हान युवा वैद्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्य लक्ष्मण लावगनकर म्हणाले, सुमारे १६ व्या शतकापासून लावगनकर परंपरेचे उल्लेख आढळतात. पेशव्यांच्या काळात वैद्य लावगनकर यांना पुण्यात बोलावून घेतल्याचे उल्लेख देखील आहेत. ती परंपरा आज विविध पद्धतीने टिकून आहे. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य जगणाऱ्या कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांनी वैद्य परंपरेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्तम उत्तम वैद्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी युवा वैद्य पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
- फोटो ओळ : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात करण्यात आले. यावेळी नाशिकचे वैद्य विभव येवलेकर यांना यंदाचा यशस्वी युवा वैद्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
