January 20, 2026

स्वतःवर विश्वास असणारेच खरे आस्तिक: सचिन पिळगावकर

0
IMG-20250604-WA0037
Spread the love

छायाचित्रकार अक्षय परांजपे यांच्या संघर्षमय जीवनावरील ‘अक्की’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: सतत पूजापाठ करून देखील यांचा स्वतःवर विश्वास नाही, असे लोक नास्तिक असतात तर कोणतेही कर्मकांड न करता देखील ज्यांचा स्वतःवर अतूट विश्वास आहे, तेच खरे आस्तिक असतात, असे मत विख्यात अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.

विल्सन या दुर्मिळ आजाराशी आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी झुंज देऊन छायाचित्रकार म्हणून आपला ठसा उमटवणारे अक्षय परांजपे यांच्या प्रेरणादायी जीवनावर त्यांचे वडील संतोष परांजपे यांनी लिहिलेल्या अक्की या पुस्तकाचे प्रकाशन पिळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, गीतकार वैभव जोशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अजित गाडगीळ, अमोल रावतेकर, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, गिरीश कुलकर्णी, अथर्व सुदामे, इंद्रनील कामत, अथर्व कर्वे, राधा सागर या पुस्तकाचे लेखक संतोष परांजपे, आणि ज्यांच्या जीवनावर आधारित असलेले अक्षय परांजपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आत्मविश्वास हा गुण प्रत्येक व्यक्तीकडे असतोच. मात्र काही वेळेला त्यावर धूळ साचते. ती झटकावी लागते. त्यासाठी काही वेळा इतर कोणाची मदत मिळते तर काही वेळेला स्वतःच ही धूळ झटकण्याचे काम करावे लागते. त्यासाठी अक्षयच्या जीवनावरील हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असे पिळगावकर यांनी यावेळी सांगितले. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक जण छोट्या छोट्या कारणांनी निराशावादी बनतात. त्यांच्यासाठी ही हे पुस्तक उपयुक्त असून चित्रपटसृष्टीत त्याचा प्रसार झाला पाहिजे, अशी अपेक्षाही पिळगावकर यांनी व्यक्त केली.

‘दुकान जल गई है, भरोसा नही जला
कल आकर देखो, दुकान खुली मिलेगी,’ हा शेर आपल्याला अक्षय भेटल्यानंतर सुचल्याचेही पिळगावकर यांनी नमूद केले.

अक्की हे पुस्तक केवळ एका व्यक्तीच्या जिद्दीचे नव्हे तर एकमेकांना साथ देणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचे पुस्तक आहे, असे मत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. करुणा, प्रेम, जिद्द, कृतज्ञता, भक्ती, श्रद्धा आदी भावनांचा आविष्कार या पुस्तकातून घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धा ही माणसाला सर्वाधिक बळ देते. सध्या एवढे बळ इतर कशातही नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या जगण्याच्या हेतूचा शोध घेऊन तो साध्य करण्यासाठी प्रत्येकाने वाटचाल करावी, असेही त्या म्हणाल्या.

या पुस्तकाचे अभिवाचन अभिनेत्री लेखिका नेहा शितोळे आणि आकांक्षा परांजपे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. मिलींद कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button