एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकासमोर उभारणार भगव्या स्वराज्यध्वजासह ५१ फूट
शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
शिवजयंती महोत्सव समितीचा सलग १३ वर्षे अभिनव उपक्रम ; शिवराज्याभिषेक तथा सार्वजनिक शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजन
पुणे : शिवराज्याभिषेक तथा शिवस्वराज्य दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी ९ वाजता शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या जगातील पहिल्या भव्य पूर्णाकृती अश्वारुढ स्मारक व शिवराज्याभिषेक शिल्पासमोर भगव्या स्वराज्यध्वजासह ५१ फूट उंच शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येणार आहे, यावेळी शिवकालीन ऐतिहासिक सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव व महिलावर्ग उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सार्वजनिक शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक व पुणे शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, लक्ष्मीबाई दत्त मंदिर यांसह ३६० गणेशोत्सव मंडळे तसेच शिवकालीन सरदारांच्या वंशजांकडून शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, संग्रामदुर्ग यासह असंख्य किल्ल्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन… शिवराज्याभिषेक दिन… साजरा होणार आहे. पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत.
शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. यावर्षी देखील विविध ठिकाणी स्वराज्यध्वज व स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन साजरा होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे प्रवर्तक अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, समीर जाधवराव, निलेश जेधे, शंकर कडू, किरण साळी, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, सागर पवार,मोहन पासलकर, किरण शितोळे, मयुरेश दळवी, सुनील देशमाने, किरण देसाई यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले आहे.
दिनांक ६ जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” म्हणून जाहिर करावा या गायकवाड यांनी २०१३ पासून सातत्त्याने केलेल्या मागणीला, आवाहनाला प्रतिसाद देत सन २०२१ साली तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी ६ जून शिवराज्याभिषेक हा दिवस “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” म्हणून शासकिय परिपत्रक काढून आपआपल्या मंत्रालया तर्फे साजरा करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतन आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस साजरा होण्यास सुरुवात झाली.
