‘दलित फाईल्स’मधून एकसंघतेचा संदेश : विनय सहस्त्रबुद्धेदिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने ‘मॅजेस्टिक’चे अशोक कोठावळे यांचा सन्मान

पुणे : दलित साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा अधिक परिपक्व व प्रगल्भ केल्या जातात. हे साहित्य मराठी वाङ्‌मयसृष्टीचे जीवनसत्व आहे. शरदकुमार लिंबाळे यांच्या वाङ्‌मयीन रचनेत आणि व्यक्तिमत्वात संयत, संवेदनशील आणि समन्वयवादी सूर दिसतो. याचे प्रतिबिंब ‘दलित फाईल्स’ या कादंबरीत दिसून येते. या कादंबरीच्या माध्यमातून एकसंघतेचा संदेश दिला गेला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार, एशिॲटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दलित साहित्याचा परीघ थोडा विस्तृत होण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुण्यातील दिलीपराज प्रकाशनच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक, ज्येष्ठ ग्रंथ वितरक अशोक कोठावळे (मुंबई) यांचा शनिवारी (दि. ३) गौरव आणि प्रसिद्ध साहित्यिक शरणकुमार लिंबाळे लिखित ‘दलित फाईल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेले ३०७५वे पुस्तक आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसिद्ध नाटककार सतिश आळेकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे मंचावर होते.

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले, आजच्या पिढीने भूतकाळाकडून वर्तमानामार्फत भविष्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या समाजाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी ‘दलित फाईल्स’ या कांबरीचे वाचन करणे आवश्यक वाटते. त्यामुळे अनेक अनुग्रह, पूर्वग्रह संपायला मदत होऊ शकते. दलित समाजातील विविध जातीसमूहांचे चित्रण वाङ्‌मयातून पुढे येणे आवश्यक असून समाजाचा परिघ मोठा करण्यासाठी या समाजाच्या तरुणांनी लिहिते होणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, अशोक कोठावळे हे मितभाषी आणि स्मितमुखी प्रकाशक आहेत. त्यांनी अंगीकृत तत्त्वांशी तडजोड न करता अतिशय नेटाने व्यवसाय यशस्वी करून दाखविला आहे. समाजाचे इव्हेंटिकरण न झालेल्या काळात विविध प्रकाशनांच्या माध्यमातून मॅजेस्टिकने वाचकांची साहित्य अभिरूची आणि साहित्याबद्दलचे आकलन विकसित केले. यातून मराठी साहित्याविषयीच्या जाणिवा अधिक समृद्ध झाल्या आहेत.

शरणकुमार लिंबाळे म्हणाले, सरस्वती सन्मान प्राप्त ‘सनातन’ या कादंबरीवर ज्या प्रमाणे खूप टीका झाली, वादळे निर्माण झाली त्याच प्रमाणे ‘दलित फाईल्स’ ही कादंबरीसुद्धा वादग्रस्त होऊ शकते. कारण माझी पुस्तके वाचली जातात, त्यावर वाद आणि चर्चा होतात.

पुरस्काराला उत्तर देताना अशोक कोठावळे म्हणाले, माझे वडिल केशव कोठावळे आणि काका तुकाराम कोठावळे यांनी १९४२ साली व्यवसाय सुरू केला. त्यांच्या दूरदृष्टीतून पुढे प्रकाशन क्षेत्रातही भरारी घेतली. यातूनच अनेक चांगले लेखक जोडले गेले आणि उत्तम प्रतिची पुस्तके निर्माण झाली. त्या काळात युटिलिटी बुक्स, प्रेरणादायक पुस्तकांची निर्मिती देखील मॅजेस्टिकच्या माध्यमातून झाली. वाचकांना आजही विविध विषयांवरील पुस्तके हवी आहेत. त्यामुळे नवनवीन प्रकाशक, पुस्तके येत आहेत.

सतिश आळेकर म्हणाले, अशोक कोठावळे हे दूरदृष्टी असणारे प्रकाशक व व्यावसायिक असून दिलीपराज मार्फत एका प्रकाशकाने दुसऱ्या प्रकाशकाचा सत्कार करणे हा हृद्य प्रसंग आहे. मराठी शाळा, शिक्षक नेमणुका बंद होऊन मोठा काळ लोटला आहे. यातूनच मराठी भाषा, शहरी प्रमाण भाषा बाजूला पडली आणि ग्रामीण भाषा व त्यातील साहित्य पुढे आले. परंतु आज तो काळही निघून गेलेला दिसतो. अशा वेळी मराठी भाषेचे वैभव परत यावे, मराठी भाषा टिकावी या करिता चाकोरीबाहेर जाऊन विचार करत कार्य होणे आवश्यक आहे.

मधुर बर्वे यांनी प्रास्ताविकात आगामी योजनांविषयी माहिती सांगितली. राजीव बर्वे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन केले. वाचन चळवळ वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणारे तृप्ती मुंडे, पंकज नवलकर, ओंकार बागल, डॉ. समीर बुधाने यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो ओळ : दिलीपराज प्रकाशन आयोजित दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) मधुर बर्वे, शरणकुमार लिंबाळे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, अशोक कोठावळे, सतिश आळेकर.
फोटो ओळ : दिलीपराज प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात (डावीकडून) मधुर बर्वे, शरणकुमार लिंबाळे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, सतिश आळेकर, अशोक कोठावळे.
प्रति,
मा. संपादक
दिलीपराज प्रकाशनच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार आणि ‘दलित फाईल्स’ पुस्तक प्रकाशनच्या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
मधुर बर्वे, संचालक, दिलीपराज प्रकाशन
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button