सृजन आर्ट गॅलरीतर्फे अनोखा उपक्रम‘काष्ठ चित्रां’च्या माध्यमातून साकारणार रवी परांजपे यांची चित्रे


पुणे : चित्रकला, इलस्ट्रेशन्स आणि बिल्डिंग पर्स्पेक्टिव्ह ड्रॉईंग्स व पेंटींग्जच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा स्वतंत्र व अजरामर ठसा उमटवणारे ज्येष्ठ चित्रकार कै. रवी परांजपे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सृजन आर्ट गॅलरीने एका वेगळ्या कलाप्रयोगाचे आयोजन केले आहे. कै. परांजपे यांच्या निवडक चार चित्रांना ‘काष्ठ चित्र’ या अतिशय नावीन्यपूर्ण माध्यमात साकारण्यात आले असून, या विशेष चित्रांचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सृजन आर्ट गॅलरी, २५० शनिवार पेठ, नारायण पेठ पोलीस चौकी मागे, येथे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. कार्यक्रमाला कै. रवी परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित रहणार असून त्यांच्या हस्ते चित्रांचे अनावरण होणार आहे.
‘काष्ठ चित्र’ : लाकडाच्या छटांमधून साकारणारी कला..
सृजन आर्ट गॅलरीचे संचालक व पुण्यातील कलाकार दांपत्य चारुहास पंडित आणि भाग्यश्री पंडित यांनी ‘काष्ठ चित्र’ हा वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकार विकसित केला आहे. यात कोणत्याही कृत्रिम रंगांचा वापर न करता, विविध नैसर्गिक रंगांच्या लाकडाच्या अत्यंत पातळ तुकड्यांना लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सफाईदारपणे कापून ते एकत्र चिकटवले जातात आणि त्यातून अत्यंत सौंदर्यपूर्ण चित्रे निर्माण केली जातात.
चारुहास व भाग्यश्री पंडित यांनी तयार केलेली ही काष्ठ चित्रे भारतात तसेच जगभरात पोहोचली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सर विवियन रिचर्ड्स, उद्योगपती कै. रतन टाटा, बिल गेट्स आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांसारख्या अनेक जागतिक मान्यवरांपर्यंत ही कला पोहोचली आहे.
चित्रशैली जपण्याचा विशेष प्रयत्न..
कै. रवी परांजपे यांची चित्रे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली असून त्यांनी कलाविषयक अनेक मार्गदर्शक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दि. ८ ऑक्टोबर या त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून, त्यांच्या मूळ चित्रशैलीला अजिबात धक्का न लावता ती तशीच ठेवून काष्ठ चित्रांच्या स्वरूपात सादर करणे, हा कला क्षेत्रातील एक अत्यंत वेगळा आणि आव्हानात्मक प्रयोग आहे, असे चारुहास पंडित यांनी सांगितले.
या वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी सर्व कलाप्रेमी व रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सृजन आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आले आहे.
• कार्यक्रम : कै. रवी परांजपे यांच्या चित्रांच्या ‘काष्ठ चित्रां’चे अनावरण
• शुभहस्ते : श्रीमती स्मिता परांजपे (कै. रवी परांजपे यांच्या पत्नी)
• गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६
• वेळ : संध्याकाळी ६:०० वाजता
• स्थळ : सृजन आर्ट गॅलरी, २५० शनिवार पेठ, नारायण पेठ पोलीस चौकी मागे, पुणे – ४११०३०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button