सुहास किर्लोस्कर लिखित ‘सिनेमा‘स्कोप’ : कथेपलीकडचा चित्रपट’ पुस्तकाचे प्रकाशन
सिनेमा समजून घेण्यासाठी ‘सिनेमा‘स्कोप’ पुस्तक ठरेल उपयुक्त : किरण यज्ञोपवीत
सिनेमाची भाषा समजण्यासाठी दृश्यात्मक व्यवहार समजणे गरजेचे : किरण यज्ञोपवीत
पुणे : आपला समाज चित्रसाक्षर नाही. सिनेमाची भाषा समजण्यासाठी दृश्यात्मकतेचा व्यवहार समजून घेण्याची प्रक्रिया घेडणे आवश्यक आहे. हे न झाल्यामुळे अलिकडच्या काळातील चित्रपट हे बोलपटाकडे झुकणारे आहेत. कलेचा प्रवास हा आंतरिक यात्रेकडे जाणारा प्रवास आहे. कुठल्याही कलेच्या चांगल्या आविष्काराने आपल्याला शांत वाटणे, अंतर्मुखता येणे किंवा विचारांची साखळी निर्माण होणे प्रेक्षक म्हणून गरजेचे आहे, असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांनी केले. ‘सिनेमा‘स्कोप’ या पुस्तकाच्या माध्यमातून चित्रपट समजून घेणारे हजारो प्रेक्षक निर्माण होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रपट अभ्यासक सुहास किर्लोस्कर लिखित ‘सिनेमा‘स्कोप’ : कथेपलीकडचा चित्रपट’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. ३०) लेखक, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत, लेखक, दिग्दर्शक, निर्माता निखिल महाजन, अभिनेता ओम भुतकर आणि मनोविकास प्रकाशनचे आशिष पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी यज्ञोपवीत बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गिरीष कुलकर्णी, पं. संजीव अभ्यंकर, अतुल पेठे यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकात विविध मुद्द्यांवर सोदाहरण विश्लेषण : सुहास किर्लोस्कर…
लेखनाविषयी बोलताना सुहास किर्लोस्कर म्हणाले, चित्रपटाचा रसास्वाद, चित्रपट दिग्दर्शकाच्या नजरेतून चित्रपटातील बारकावे कसे पहावेत, पटकथेमधील पात्र रचनेपासून दिग्दर्शकाच्या दृष्टीपर्यंत, चित्रपटातील प्रतिकात्मकता, कोणत्या साहित्यवरील चित्रपट कसे बघावेत अशा विविध विषयांवर सोदाहरण विश्लेषण करण्यात आले आहे.
किरण यज्ञोपवित पुढे म्हणाले, चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी हे पुस्तक खऱ्या अर्थाने उत्तम मार्गदर्शक असून यात छोट्या छोट्या संज्ञांच्या माध्यमातून अनेक दाखल्यांसहित मांडणी केली आहे. या पुस्तकात खूप चांगल्या संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने सांगितल्या गेल्या आहेत. कुठल्याही कलेचा स्वत:चा एक निजसंवाद असतो आणि तो आपल्यालाच उमगत हा प्रवास निरंतर, चिरंतन असणे आवश्यक आहे.
चित्रपट पाहणे केवळ मनोरंजनात्मक कला नव्हे : ओम भुतकर…
ओम भुतकर म्हणाले, कुठल्याही कलेचा रसास्वाद घेण्यासाठी त्यातील बारीकसारिक गोष्टींची किमान तोंडओळख असणे आवश्यक आहे. चित्रपट पाहणे ही नुसती वरवरची मनोरंजनात्मक प्रक्रिया नसते. चित्रपट माध्यमातून मुलभूत गोष्टी जाणून घेतल्याशिवाय चित्रपटाचा पूर्ण रसास्वाद घेणे शक्य नसते. अशा वेळी ‘सिनेमा‘स्कोप’ या पुस्तकाचे महत्त्व अधिक आहे. कारण चित्रपट माध्यमात अनेक कलांचा एकत्र संगम होत असल्याने त्यातील क्लिष्टता वाढत जाते.
‘सिनेमा‘स्कोप’द्वारे चित्रपटाचा रसास्वाद घेणे शक्य : निखिल महाजन..
चित्रपट निर्मिती म्हणजे एखादी गोष्ट सांगणे नसते, असे सांगून निखिल महाजन म्हणाले, चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात वेगवेगळ्या भावनांची निर्मिती करणे गरजेचे असते. या करिता दिग्दर्शक विविध माध्यमांचा एकत्रित वापर करत असतो. या पुस्तकाच्या माध्यमातून चित्रपटाचा रसास्वाद घेण्याचे कार्य घडणार आहे.
चित्रपटाचे व्याकरण समजेल : आशिष पाटकर…
आशिष पाटकर म्हणाले, चित्रपट कुठल्या जबाबदाऱ्यांमधून निर्माण होतो हे या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. संवेदनशील समाज घडवायचा असेल तर अशा कलात्मक विषयांवर पुस्तके निर्माण होणे आवश्यक आहे. चित्रपटाचे संपूर्ण व्याकरण समजावून सांगण्याचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून घडणार आहे.
सतीश जकातदार, उमेश कुलकर्णी, समर नखाते, डॉ. अरुण गद्रे, राजीव तांबे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार सुहास किर्लोस्कर, निशा किर्लोस्कर, आशिष पाटकर, रिना पाटकर यांनी केला. सुबोध पाठक यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : ‘सिनेमा‘स्कोप’ : कथेपलीकडचा चित्रपट’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) किरण यज्ञोपवीत, निखिल महाजन, ओम भुतकर, सुहास किर्लोस्कर, आशिष पाटकर.
