बंदिशींमधून उलगडल्या प्रेमाच्या विविध छटाकलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित ‘अष्टनायिका’
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेच्या बंदिशींमधून प्रेमाच्या विविध छटा उलगडल्या. अष्टनायिकांची प्रेमरूपे दर्शविताना वासकसज्जा, स्वाधीनपतिका, प्रोषितभ्रर्तृका, विरोहत्कंठिता, विप्रलब्धा, खंडिता, कलहांतरिता आणि अभिसारिकेचे विलोभनीय दर्शन रसिकांना घडले.
निमित्त होते कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित आणि साईराग एन्टरटेंनमेंट निर्मित ‘अष्टनायिका २.०’ या कार्यक्रमाचे. एस. एम. जोशी सभागृहात या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाते.
अल्लड तारुण्यात उमलणारी प्रेमभावना, कधीतरी झालेले रुसवे फुगवे, दोघांमध्ये अचानक आलेला विरह, प्रियकराच्या भेटीसाठी आसुसलेली नायिका, प्रेयसीच्या विचारात स्वप्नरंजन करणारा प्रियकर, रिक्तपणाने भारलेली प्रेमिकांची अवस्था, भेटीसाठी चंचलता दर्शविणारी मनाची अवस्था, गैरसमजातून आलेला दुरावा, एकटेपण, प्रियकराशी कलह झाला असला तरी त्याच्या भेटीसाठी असलेले आसुसलेपण आणि अभिसारिकेच्या रूपात जगाचे नियम ओलांडून प्रियकराची भेट घेणारी नायिका अशी प्रेमाची सहज सुंदर कथा विविध रागांच्या बंदिशीतून साकारली गेली तेव्हा रसिकांना जणू स्वत:च्या आयुष्यातील प्रेमभावनेचे विविध टप्पे अनुभूतीस आले.
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सायली पानसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बंदिशींचे सादरीकरण करण्यात आले. राग बिहागमधील ‘छब तोरी प्यारी निहारत हूँ मै’, राग पटदीपमधील ‘तोरा मुखचंद्र देखे बिन कैसे जाऊ’, राग सारंगमधील ‘जुग जुग बिते दरस को पिया’, राग किरवाणीमधील ‘तोरी सुरतिया देखू सपनोमे आज’, राग प्रतिक्षामधील नीलतालातील ‘अब घर आजा प्रितम’, राग अभोगीमधील ‘कोई नही तेरा जगमे’ अशा विविध बंदिशींचे सादरीकरण करताना सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश बडवे आणि गायिका राजेश्री वैरागकर यांनी आपल्या सुमधुर स्पष्टोच्चारातून प्रत्येक बंदिशीतील भाव रसिकांपर्यंत ताकदीने पोहोचविला. कार्यक्रमाची सांगता ‘रैन अंधेरी पग चले पिया मिलन’ या भैरवीतील बंदिशीने करण्यात आली. सायली पानसे यांनी आधुनिक काळातील प्रेमकथा उलगडताना बंदिशींचे महत्त्व विशद करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. अभिजित बारटक्के (तबला), निलय सालवी (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत करून मैफलीत रंग भरले.
कलासक्त फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली आणि कलाकारांचा सत्कार केला. फाऊंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. विनिता आपटे प्रास्ताविक व कलाकारांचा परिचय करून दिला.
फोटो ओळ : अष्टनायिका कार्यक्रमात सहभागी सायली पानसे, अभिजित बारटक्के, ऋषिकेश बडवे, राजेश्री वैरागकर, नियल सालवी.
प्रति,
मा. संपादक
प्रेम भावनेची विविध रूपे दर्शविणाऱ्या भावछटांचा प्रवास ‘अष्टनायिका २.०’ या कार्यक्रमाद्वारे बंदिशींच्या माध्यमातून उलगडण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
श्रीरंग कुलकर्णी, अध्यक्ष, कलासक्त कल्चरल फाऊंडेशन
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
