September 25, 2026

गझलविधा समूहातर्फे वार्षिक पुरस्कार वितरण समारंभगझल लेखनात तंत्राविषयी निष्णात असावे : प्रा. सिद्धार्थ भगत

0
IMG-20260824-WA0015
Spread the love


पुणे : गझल लेखनाचे तंत्र म्हणजे बाह्य आवरण असून ते किती कौशल्याने सांभाळता येते, त्याचा नेमका वापर कसा करायचा हे समजले पाहिजे. त्यामुळे तंत्राच्या बाबतीत निष्णात असणे गरजेचे आहे. हे तंत्र गवसल्यावर मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त किंवा लयबद्धतेत गझल लिहिता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार प्रा. सिद्धार्थ भगत यांनी केले.
गझलविधा समूहातर्फे गझलविधा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. प्रा. सिद्धार्थ भगत यांचा गझल साफल्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. नचिकेत जोशी यांना ‘शुभ्र मनाचा कागद’ या गझल संग्रहासाठी गझल बहर पुरस्काराने तर जयश्री कुलकर्णी यांना गझल लेखनासाठी गझल पालवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गझलविधा समूहाचे प्रमुख प्रशासक भूषण कटककर, डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे, डॉ. शिवाजी काळे मंचावर होते. सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी समीक्षक संजय गोरडे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
लेखनामध्ये मी कुणाला गुरू केलेले नाही आणि माझा कुणी चेला देखील नाही, असे सांगून प्रा. सिद्धार्थ भगत म्हणाले, गझलकार सुरेश भट यांच्या गझला वाचून मी प्रभावित झाल्याने लिहिता झालो.
पुरस्कारामागील भूमिका विशद करताना प्रमोद खराडे म्हणाले, कादंबरीचा आशय दोन ओळीत गझलेतून सादर करता येतो. पुरस्कार देणारी संस्था, त्यांचे कार्य, तेथील काम करणाऱ्या व्यक्तींचे महत्त्व पुरस्काराची उंची वाढविते.
गझल संग्रह छपाईचे आजच्या काळात स्थान याविषयी मत व्यक्त करताना डॉ. शिवाजी काळे म्हणाले, छापिल साहित्यकृतीतून साहित्यिक पिढ्यानुपिढ्या जीवंत राहतो. लेखक लिहिण्याचा कंटाळा करतो म्हणून वाचक संख्या कमी होत आहे.
डॉ. कैलास गायकवाड, जयश्री कुलकर्णी, समीक्षक डॉ. स्नेहल कुलकर्णी, संजय गोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. वैजयंती आपटे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. अमिता पेठे-पैठणकर, प्राजक्ता वेदपाठक, जनार्दन म्हात्रे यांनी मानपत्रांचे वाचन केले.
वैशाली माळी यांनी सूत्रसंचालन केले तर मुक्ता भुजबले यांनी आभार मानले. प्राजक्ता पटवर्धन यांनी मुशायराचे सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : गझलविधा समूह आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शिवाजी काळे, डॉ. कैलास गायकवाड, नचिकेत जोशी, प्रा. सिद्धार्थ भगत, जयश्री कुलकर्णी, संजय गोरडे, प्रमोद खराडे, भूषण कटककर, जनार्दन म्हात्रे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी