September 25, 2026

सतार, सनई, तबलावादनाचा ‘त्रिवेणी’ संगमऋत्विक फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात प्रतिभासंपन्न कलाकारांचे बहारदार सादरीकरण

0
IMG-20260824-WA0075
Spread the love

पुणे : तबला, सतार आणि सनई अशी तीन वाद्ये आणि बुजुर्ग, मधल्या पिढीचे आणि युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे, तीन प्रतिभासंपन्न कलाकार असा त्रिवेणी स्वरसंगम रसिकांनी येथे अनुभवला.

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफार्मिंग आर्ट्स आयोजित ‘त्रिवेणी’ या विशेष मैफिलीत तीन वादक कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद रसिकांना मिळाला. कोथरूडमदील ऋत्विक फाऊंडेशनच्या सभागृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मैफल रंगली.
युवा तबलावादक स्वप्नील भिसे यांच्या एकल वादनाने मैफिलीची सुरुवात झाली. त्यांनी अर्धशिखर ताल (साडेआठ मात्रा) सादर केला. पं. योगेश समसी यांचे शिष्य असणाऱ्या स्वप्नील यांनी अर्धशिखर तालांतर्गत केलेली एकतालाची मूर्च्छना विशेष दाद मिळवून गेली. उस्ताद झाकीर हुसेन यांचे काही कायदे, पं. योगेश समसी यांच्या रचना, तसेच पेशकार, टुकडे, चक्रधार, परण यांचे सादरीकरण जोरकस तरीही नजाकतदार होते. त्यांच्या वादनातील स्पष्टता, दमदारपणा उल्लेखनीय होता. त्यांना प्रियांका भिसे यांनी लेहरासाथ केली.

त्यानंतर प्रसिद्ध सतारवादक संदीप आपटे यांच्या बहारदार वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी राग गावती पेश केला. आलाप, जोड, झाला अशा क्रमाने हे सतारवादन खुलत गेले. मध्यलय त्रितालातील आणि द्रुत त्रितालातील त्यांनी सादर केलेल्या रचना उस्ताद विलायत खाँसाहेब यांच्या होत्या. गायकी अंगाने वादन, हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवले. अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेले सविस्तर आणि सुदीर्घ वादन, हे त्यांच्या वादनाचे वेगळेपण होते. रागवाचक प्रत्येक सुराचे रागातील स्थान, नेमकेपणाने अधोरेखित करत संदीप आपटे यांनी आलापीतूनच गावतीचे नादचित्र रेखाटले. त्यांना तबल्यावर सोहम गोराणे यांनी वादनाची रंगत वाढविणारी साथ केली.

ज्येष्ठ सनईवादक पं. शैलेश भागवत यांच्या परिपक्व वादनाने या रंगतदार मैफिलीचा सुरेल समारोप झाला. त्यांनी समयोचित असे राग बागेश्री आणि राग मालकंस सादर केले. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘मर्मबंधातली ठेव ही’ आणि ‘घेई छंद मकरंद’ ही दोन नाट्यपदेही ढंगदारपणे सादर केली. त्यांना डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे (संवादिनी), महेशराज साळुंके (तबला) तसेच विठ्ठल केंगार (सनई) यांनी अनुरूप साथ केली. ऋत्विक फाऊंडेशनचे संचालक प्रवीण कडले आणि चेतना कडले यांनी कलाकारांचे स्वागत केले. श्रुती पोरवाल यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो : संदीप आपटे, पंडित शैलेश भागवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी