September 26, 2026

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचा शताब्दी वर्षारंभ बुधवारी

0
IMG-20260824-WA0023
Spread the love

‘शतकाचा वारसा… भविष्याचा ध्यास!’ संकल्पनेतून शताब्दी सोहळ्याला होणार सुरुवात

पुणे : शैक्षणिक क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि गौरवशाली वाटचालीचा ठसा उमटविणाऱ्या दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला २९ ऑगस्ट २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘शतकाचा वारसा… भविष्याचा ध्यास!’ या संकल्पनेतून संस्थेच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार आहे. या ऐतिहासिक पर्वानिमित्त वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सोमवार पेठ येथील संस्थेच्या सभागृहात ‘शताब्दी प्रारंभ सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. निवृत्त कर्नल प्रा. शिशिर कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शताब्दी वर्षाचे निमंत्रक आणि संस्थेचे मानद अध्यक्ष संजीव ब्रह्मे उपस्थित असणार आहेत.
या सोहळ्यात संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण, संस्थापक दिन विशेष कार्यक्रम होणार आहे. तसेच यंदाच्या बोर्ड परीक्षेत रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवून संपादन केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा व एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
‘इतिहासाचा गौरव वर्तमानाची साथ भविष्याचा वेध’ आणि ‘सततम् उर्ध्वम्’ या विचारातून संस्थेच्या शताब्दी वर्षाची वाटचाल पुढे नेण्यात येणार आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्थापक, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांच्या योगदानाचे स्मरण वर्षभर विविध उपक्रमांतून करण्यात येणार आहे.
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये वर्षभर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, माजी विद्यार्थी मेळावे तसेच संस्थेच्या इतिहासाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये शताब्दी महोत्सवाचा मुख्य सोहळा आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव महाजन आणि मानद सचिव प्रफुल्ल निकम यांनी कळविले आहे. संस्थेचा शताब्दी प्रवास हा केवळ भूतकाळाचा गौरव करणारा नसून, पुढील पिढ्यांसाठी शिक्षणाची नवी दिशा निश्चित करणारा असावा, या भावनेतून शताब्दी वर्षातील उपक्रमांची आखणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी