January 19, 2026

सिंधुताईंचे कार्य वटवृक्षांसारखे आहे; ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभूणे यांचे प्रतिपादन

0
IMG-20260104-WA0054
Spread the love

रेणुताई गावस्कर व सेवा संकल्प प्रतिष्ठानला ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय’ पुरस्कार- 2026 प्रदान

माईंचा खडतर प्रवासाची गोष्ट उलगडून सांगणारा चिंधीची गोष्ट हा बालकथासंग्रह प्रकाशित

पुणे : सिंधुताई सपकाळ या कारुण्याचा झरा होत्या, सेवेतून त्यांनी आपले कार्य केले आणि ते करत असताना त्यांनी इतरांच्या कार्यालाही मदत केली, सामाजिक कार्यात कार्यरत असलो तरी मला लोकांशी मदत मागायला कसे बोलायचे हे समजत नसे, त्यावेळी त्यांनी मला सांगितले तुम्ही बोलला नाही तर तुमचे कार्य समजणार कसे, त्यांनी मला एक प्रकारची ऊर्जा दिली आणि मी आज इथपर्यंत पोहोचलो, सिंधुताईंचे कार्य वटवृक्षांसारखे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभूणे यांनी केले. 

बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘पद्मश्री’ डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ ( माई ) यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘माई परिवार’तर्फे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष. मानाचा ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ सामाजिक क्षेत्रात नि:स्पृहपणे काम करणाऱ्या  रेणुताई गावस्कर (अध्यक्षा – एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि सेवा संकल्प प्रतिष्ठान (चिखली, जि. बुलढाणा) यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रभूणे बोलत होते. या प्रसंगी विलू पूनावाला फाऊंडेशनचे सीईओ जसविंदर नारंग, नंदकूमार आणि आरती पालवे (सेवा संकल्प प्रतिष्ठान), कल्याणी ग्रुपचे आनंद चिंचोळकर, ममता सिंधुताई सपकाळ,दीपक गायकवाड,विनय सपकाळ,मनीष बोपटे आदि मान्यवरांसह सर्व माई परिवार उपस्थित होता.  माईंचा खडतर पण प्रेरणादायी जीवनप्रवास लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी माई पब्लिकेशन्स तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘चिंधीची गोष्ट’ या विशेष बालकथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. 

पुढे बोलताना प्रभूणे म्हणाले, सिंधुताई या खूप कणखर होत्या , एखादे झाडं जसे आपली मुळे खोलवर रुजवतो ती मुळे कोवळी असली तरी खडकाला भेदून खोलवर रुजतात आणि आपल्याला मात्र फक्त डौलदार वृक्ष दिसतो तसे माईंचे काम आहे. आज माई परिवाराला सांभाळणाऱ्या त्यांच्या कन्या ममता यांच्यातही त्यांचे सर्वगुण आलेले आहेत, त्यांच्यातही कारुण्याचा झरा आहे, असे निश्चितपणे म्हणत येईल. माता यशोदेने  भगवान श्रीकृष्णाचा सांभाळा केला त्याने जसे युद्ध गाजवले तसेच माईंच्या नावाचा पुरस्कार समाजसेवेचे युद्ध करणाऱ्या दोघांना दिला जात आहे ही आनंदाची बाब आहे. 

सत्काराला उत्तर देताना रेणुताई गावस्कर म्हणाल्या, सिंधुताई आणि मी दोघी सुद्धा खूप वाचन करत असू, त्यातून आम्ही समाज वाचायला शिकलो, मी शिक्षणात असले तरी मला अनेकदा लहान मुलांकडून शिकायला मिळते. अर्थपूर्ण शिक्षण मुलांना मिळायला हवे, त्याशिवाय खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मिती होणार नाही. मला वाटते माझ्या कामातून दहा मुले जरी घडली तरी आपण राष्ट्र निर्मितीचे कार्य केले याचे समाधान लाभेल. 

नंदकूमार पालवे म्हणाले, आज माईंच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे पद्मश्री मिळाल्या सारखे आहे. हा पुरस्कार माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना समर्पित करतो. ज्या व्यक्तींना काहीही भान नसते अशा व्यक्तींचा आम्ही सांभाळ करतो, त्यातून अनेक रुग्ण बरे झाले आहेत, चार रुग्णांपासून सुरू झालेला प्रवास साडे तीनशे पर्यंत पोहोचला आहे. हा पुरस्कार ऊर्जा देणारा आहे. आपण एकदा आमच्या आश्रमाला भेट देऊन बेवारस व्यक्तींचे नातेवाईक व्हा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवायला या असे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले, आनंद चिंचोळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर (अमरावती) यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ बासरीवादक अमर ओक आणि सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांचा ‘ऋतु बरवा’ हा शब्द-सुरांचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button