श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टजय गणेश रूग्ण सेवा अभियान
५१६० दिव्यांगांना विविध
उपकरणांचे मोफत वाटप
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या जय गणेश रुग्णसेवा अभियानात ५१६० दिव्यांग व्यक्तींना विविध उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले आहे, महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग व्यक्तींना या उपक्रमातून सुविधा मिळाल्या आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या उपकरणांमध्ये कृत्रिम हात आणि पाय, कॅलिपर, कुबड्या, काठी, व्हिलचेअर, वॉकर अशा उपकरणांचा समावेश आहे. ट्रस्टच्या हिराबाग कोठी सजावट विभाग येथे दर तीन महिन्यांच्या अंतराने दिव्यांगांसाठी शिबिर घेतले जाते. राज्यातील अनेक भागांमधून दिव्यांग व्यक्ती येथे येतात. शिबिरातच उपकरणांचे वाटप केले जाते. अनेक दिव्यांगांना या उपक्रमातून दिलासा मिळाला आहे, अशी माहिती रासने यांनी दिली.
या उपक्रमासाठी पिनॅकल इंडस्ट्रिज (पुणे), साधू वास्वानी मिशनचे बुधराणी हॉस्पिटल (पुणे), ईनाली फौंडेशन, आर.के फौंडेशन (पुणे), ससून रूग्णालय समाजसेवा अधिक्षक कार्यालय आदी संस्थांचे ट्रस्टला सहकार्य मिळत आहे, असे रासने यांनी कळविले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट माध्यमातून आणि पिनॅकल इंडस्ट्रिज लिमिटेड यांच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन ग्रामीण भागातच फिरवली जाईल, अशी माहिती सुनील रासने यांनी पत्रकात दिली आहे. या सर्व उपक्रमांची व्यवस्था ट्रस्टबरोबर सुवर्णयुग तरूण मंडळ पहाते.
कळावे.
आपला,
सुनील रासने,
अध्यक्ष,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे.
