साईश्री विटालाईफ हॉस्पिटलचा जर्मनीच्या एसओआरजी संस्थेशी सहकार्य· दुभंगलेल्या ओठांच्या मोफत शस्त्रक्रियेबाबत स्प्रेडिंग स्माईल्स सीएसआर उपक्रमाला जर्मन तंत्रज्ञानाचे पाठबळ
पुणे,16 डिसेंबर 2025 : दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू असणाऱ्या मुलांसाठी साईश्री विटालाईफ हॉस्पिटल ने जर्मनीस्थित स्ट्रॅसबर्ग ऑस्टिओसिंथेसिस रिसर्च ग्रुप (एसओआरजी) सोबत सहकार्य केले असून या अंतर्गत गरजू मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. एसओआरजी समूहाची डॉक्टरांची टीम सध्या भारत भेटीवर असून त्यांनी नुकतीच वाकड येथील नव्याने सुरू झालेल्या साईश्री विटालाईफ हॉस्पिटलला भेट दिली. याआधीच्या दोन भेटी या औंधमधील साईश्री युनिटला दिल्या होत्या.
प्राथमिक क्लेफ्ट लिप आणि पॅलेटच्या शस्त्रक्रिया या मोफत केल्या जातात व नंतरच्या टप्प्यातील शस्त्रक्रियांच्या बाबतीत रिजिड एक्स्टर्नल डिव्हाईसेस डिस्ट्रॅक्टर्स सारख्या उपकरणांच्या खर्चाची जबाबदारी हॉस्पिटल उचलते.
ही एक जागतिक स्तरावरील प्रसिध्द शैक्षणिक संस्था असून दुभंगलेले ओठ, दुभंगलेल्या टाळूवर उपचार,जबड्याच्या शस्त्रक्रिया व चेहऱ्यासंबंधी शस्त्रक्रिया (मॅक्सिलोफेशियल),तोंडाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शक तत्वे व प्रगत उपचार प्रोटोकॉल्स तयार करते.
साईश्री विटालाईफ हे 305 बेडसचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून 6 क्लिनिक्स व 3 रूग्णालय असलेल्या तसेच झपाट्याने विस्तारीत होत असलेल्या साईश्री विटालाईफ ग्रुपचा एक भाग आहे.
मॅस्ट्रीश्ट विद्यापीठाचे प्रमुख व मॅक्सिलोफेशियल आणि प्लास्टिक सर्जन प्रा.डॉ.पी.ए.डब्ल्यू.एच. केसलर, नेदरलँडसमधील ओरल व मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ.वेरॉनिक टीमर व डॉ.निंक ली आणि एसओआरजी इंडिया चॅप्टरच्या अध्यक्ष डॉ.सरूची अग्रवाल, साईश्री विटालाईफ ग्रुपचे अध्यक्ष डॉ.नीरज आडकर आणि साईश्री विटालाईफ हॉस्पिटल येथील मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.पुष्कर वाकनीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
साईश्री विटालाईफ हॉस्पिटल येथील मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.पुष्कर वाकनीस यांनी या सहकार्य व स्प्रेडिंग स्माईल्स सीएसआर उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, नेदरलँडसमध्ये डॉ.केसलर यांना 2012 साली मी भेटलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी या उपक्रमात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती.
क्लेफ्ट लिप हा एक जन्मजात दोष असून वरच्या ओठातील पेशी गर्भधारणेच्या सुरूवातीला एकत्र न जुळल्याने ही परिस्थिती उद्भवते आणि कधीकधी ही फट नाकापर्यंत पसरते आणि काही वेळेस फाटलेल्या टाळूसह आढळते. क्लेफ्ट लिपची प्राथमिक शस्त्रक्रिया ही वयाच्या 3 ते 6 महिन्यात तर,क्लेफ्ट पॅलेटची शस्त्रक्रिया वयाच्या 9 ते 18 महिन्यात केली जाते. या शस्त्रक्रिया वेळेवर केल्या नाहीत तर बोलण्यामध्ये अडचण,ऐकू कमी येणे,दातांच्या समस्या आणि एकंदर जीवनमानावर विपरीत परिणाम होऊ शकतो.क्लेफ्ट लिप ही समस्या सर्व सामाजिक,आर्थिक स्तरांमध्ये आढळते.
साईश्री विटालाईफ ग्रुपचे अध्यक्ष डॉ.नीरज आडकर म्हणाले की,आजवर 150 हून अधिक लहान मुलांना याचा फायदा झाला असून आम्हाला हा उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहचवायचा आहे,याचे कारण जन्मजात क्लेफ्ट लिपची समस्या असणाऱ्या मुलांच्या विकासामध्ये या शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
डॉ.पुष्कर वाकनीस पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानामधील नवीन सुधारणा हे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये अधिक अचूकता व चांगले परिणाम मिळवून देत आहेत.त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन ऑस्टिओजेनेसिस (डीओ) आणि रिजिड एक्सटर्नल डिव्हाईस (आरईडी) यांचा समावेश आहे.
डिस्ट्रॅक्शन ऑस्टिओजेनेसिस या तंत्रामध्ये जबड्याच्या वरील भागावर प्रक्रिया (ऑस्टिओटॉमी) करून हाडांच्या भागांमध्ये जागा सोडली जाते,जेणे करून नवीन हाडे तयार होतात आणि विकार दूर होण्यास मदत होते. वरील नमूद केलेल्या हाडांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी विशेष उपकरणांचा (डिस्ट्रॅक्शन डिव्हाईसेस) वापर केला जातो. डीओ या तंत्रज्ञानामुळे जबडा व चेहऱ्यावरील भागातील विकारांमध्ये अचूक दुरूस्ती होण्यास मदत होते.
रिजिड एक्सटर्नल डिव्हाईस (आरईडी) हे विशेष उपकरण असून चेहऱ्यावरील विकार असलेल्या मुलांमध्ये वरील जबडा पुढे ढकलण्यासाठी वापरला जातो. यासाठी धातूच्या फ्रेमचा वापर केला जातो आणि रोज थोडे थोडे समायोजित केले जाते. या हळूवार हालचालींमुळे नवीन हाडांची निर्मिती होते, तसेच चेहरा अधिक चांगला दिसायला लागतो आणि श्वास घेण्यास व खाण्यास अधिक सुलभता जाणवते. या उपक्रमामध्ये आरईडी फ्रेम्स या जर्मन सर्जिकल डिव्हाईस उत्पादक असलेल्या केएलएस मार्टीन ने दान केले आहे.
एसओआरजी इंडिया चॅप्टरच्या अध्यक्ष डॉ.सरूची अग्रवाल म्हणाल्या की, एसओआरजी चे मुख्य उद्दिष्ट हे पदव्युत्तर अभ्यास प्रदान करणे तसेच शिकाऊ व अनुभवी शल्यचिकित्सकांना अद्ययावत मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रियांमध्ये प्रशिक्षित करणे हे आहे. यामध्ये क्लेफ्ट लिप शस्त्रक्रिया,चेहऱ्यावरील हाडांच्या फ्रॅक्चरबाबत शस्त्रक्रिया आणि तोंडाच्या कर्करोगाबाबत शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
