हिंदूंनी आपल्या अधिकारांसाठी जागृत होण्याची आवश्यकतासर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता ऍड. विष्णू शंकर जैन ; सर्व हिंदू संघटना, पुणे यांच्या तर्फे विविध पुरस्कारांचे वितरण
पुणे : केंद्रासह विविध राज्यांमध्ये सरकार बनत आहेत. मात्र, हिंदूंसाठी काय? हा प्रश्न आपण विचारायला हवा. अल्पसंख्यांकांचा मुद्दा गंभीर असून यावर चर्चा होणे गरजेचे आहे. अनेक राज्यांमध्ये प्रलोभने दाखवून धर्मपरिवर्तन होत आहेत. हिंदूंसमोर हे संकट असून आपल्या अधिकारांसाठी जागृत होण्याची आवश्यकता आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता ऍड. विष्णू शंकर जैन यांनी व्यक्त केले.
शिवप्रतापगड उत्सव समिती, पुणे यांच्या तर्फे शिवप्रताप दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी लेफ्टनंट जनरल सतीश नवाथे, ह.भ.प. संग्रामबापू भंडारे, पावन सराफ, स्वाती मोहोळ, समितीचे अध्यक्ष संजय भोसले, प्रमुख संयोजक मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्य भूषण जीवा महाले पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता ऍड. विष्णू शंकर जैन, शिवभूषण गोपीनाथ पंत बोकील पुरस्कार ऍड. विश्वास पानसे (सासवड), हिंदुत्व शौर्य पुरस्कार समीर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. तर, प्राज भिलारे आणि गोकुळ आठरे यांचा विशेष सन्मान यावेळी झाला. शिवशाहीचे प्रतीक असलेले सोन्याचे कडे याप्रसंगी विष्णू शंकर जैन यांना देण्यात आले. अफजलखान वधाचा पोवाडा शाहीर कामथेे यांनी सादर केला.
ऍड. विष्णू शंकर जैन म्हणाले, मी पुण्यात शिक्षणासाठी असताना तब्बल २० वर्षांपूर्वी आपल्यावर समाजवादाची दाट छाया होती. मात्र, आज क्रांती झाली आहे, याचा आनंद होतो. आपली एकजूट झाली नाही, तर मालेगाव सारख्या केस मध्ये निर्दोष असूनही संबंधितांवर झालेल्या अत्याचारासारख्या घटना वारंवार होतील. न्यायालयांमध्ये हिंदुनिष्ठ लोक आहेत. मात्र, त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आपण एकत्र यायला हवे.
संग्रामबापू भंडारे म्हणाले, धर्मावर आणि भगवंतावर आपले प्रेम असणे आवश्यक आहे. आपला संकल्प सत्य असेल, तर परमेश्वरी शक्ती आपल्या पाठीमागे उभी राहते. तशीच शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभी राहिली आणि शिवप्रताप दिनाचा पराक्रम आपण सर्वानी पाहिला, असेही त्यांनी सांगितले.
मिलिंद एकबोटे म्हणाले, अफजल खान स्वारीच्या संकटामुळे हिंदवी स्वराज्याला रोज नुकसान पोहोचत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेत अफजल खान हा अजिंक्य योद्धा वाटत होता. परंतु अफजलखानाचा पराभव करून महाराजांनी हिंदू धर्माला संरक्षण दिले आणि आदिलशहाच्या परकीय सत्तेला निष्प्रभ केले. म्हणून शिवप्रताप दिन हा हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस ठरला. राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा हा दिवस १९९६ पासून साजरा केला जातो. आज हिंदुत्ववादी पक्ष मुस्लिम तुष्टीकरण करण्यासाठी हिंदू समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. लेफ्टनंट जनरल सतिश नवाथे यांसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.
- अफजलखान वधाचा पुतळा उभा राहिला नाही, तर तीव्र आंदोलन
प्रतापगडाच्या पायथ्याशी जिथे अफजलखान वध झाला, तिथे अफजलखान वधाचा पुतळा उभा राहिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पुण्यामध्ये हा पुतळा तयार असून धूळ खात पडला आहे. लवकरात लवकर हा पुतळा त्या जागी न बसवल्यास आंदोलन होईल, असा इशारा मिलिंद एकबोटे यांनी यावेळी दिला. - फोटो ओळ : शिवप्रतापगड उत्सव समिती, पुणे यांच्या तर्फे शिवप्रताप दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात झाले. हिंदवी स्वराज्य भूषण जीवा महाले पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता ऍड. विष्णू शंकर जैन यांना प्रदान करण्यात आला.
