-कसब्यात क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्साहात साजरीश्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन
पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. मुख्य जन्मसोहळ्याच्या निमित्ताने लघुरुद्र, श्री भैरव अष्टोत्तर शत नामावली, रुद्र अभिषेक आणि रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा, महाआरती संपन्न झाली.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने मंदिराला नयमरम्य सजावट करण्यात आली, तसेच आकर्षक पुष्पसजावट देखील साकारण्यात आली होती.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आरती, दुपारी श्री भैरव अष्टोत्तरशतनामावली आणि सायंकाळी सुदर्शन होम झाला. याशिवाय दुसऱ्या दिवशी गण होम, श्री भैरव अष्टोत्तरशतनामावली, दुर्गा पूजा व आरती देखील झाली.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात, असे आवाहन ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
