भावभावना, कल्पनांचे रंग लाभल्यास उत्तम लिखाण घडतेलेखक आपल्या भेटीला : भारत सासणे, मृणालिनी चितळे, दादाभाऊ गावडे यांच्याशी संवादपुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळ्यात साहित्यिक उपक्रम
पुणे : लेखकाने सामान्यांच्या सुखदु:खाविषयी करूणा, आस्था, प्रेम दाखवत साहित्यनिर्मिती केल्यास ती उत्तमच होते. योग्य वयात अद्भुत रसाचा संबंध आल्यास व्यक्ती शुष्क, पोटार्थी न बनता त्याच्यात तरलता, संवेदनक्षमता, उच्च कलांची अभिरुची निर्माण होते. मानवी भावभावना हा कथांचा विषय होऊ शकतो. एखादा प्रसंग, वाक्य, वाचलेले विधान मनाच्या गाभ्यात खोल रुजत जाते, त्याला लेखकाच्या मनातील भावभावनांचे, कल्पनांचे रंग लाभल्यास उत्तम लिखाण घडते. वेदना जगत गेल्यास त्याची मांडणी लेखणीतून साकारते आणि लेखणीला वेगळेच बळ प्राप्त होते, असे विचार साहित्यिकांनी मांडले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे 23वा पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. यात आज (दि. 1) लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध कथालेखक, कादंबरीकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, सुप्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे तसेच लेखक दादाभाऊ गावडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा रंगल्या. डॉ. निर्मोही फडके यांनी संवाद साधला.
चांगले वाचन, भोवतालची पोषक परिस्थिती यातून लेखनाचे बीज रुजत जाते, असे सांगून भारत सासणे म्हणाले, मी प्रशासनातील शिस्त लेखनात आणली आणि लेखनातील विवेक प्रशासन कार्यात वापरला. चांगले वाचन, सुयोग्य वातावरण आणि संस्कार यातून माझ्यातील लेखकाची जडणघडण झाली. लेखन करताना परचित्त प्रवेशाला महत्त्व आहे. तरच सर्जनात्मक लिखाण घडून सत्याचे दर्शन होत वेदना प्रकट होते.
मृणालिनी चितळे म्हणाल्या, कथा हा साहित्यप्रकार मला आवडतो. भावभावना हा कथांचा विषय होऊ शकतो. कथेत जग सामवून घेण्याची कुवत असते. वेस नसलेल्या गावाप्रमाणे एखादी कथा पसरत जाते. कथा म्हणजे मनात राहिलेल्या माणसांना घर करून देत संगती-विसंगती मांडणे होय. चरित्र लेखन करताना तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक असते. तसेच काळाच्या संदर्भात व्यक्ती जोखावी लागते. अशा लेखन प्रकारात लेखक आपल्या कल्पनेचे रंग मिसळू शकत नाही. लेखन क्षेत्रात संवेदनशीलता स्वीकारून स्त्री-पुरुष असा भेदभावा नसावा.
दादाभाऊ गावडे म्हणाले, माझ्या साहित्यक्षेत्राची सुरुवात कवितेतून झाली. गावगाड्यात जगत असताना वास्तववादी आणि संवेदनात्मक लेखन करत गेलो. अभ्यास केल्याशिवाय लेखन करणे योग्य नाही. आज ग्रामीण संस्कृतीची घुसमट होत आहे. रोजीरोटीचा संघर्ष, गावगाड्याची परिस्थिती, आठवणीतला गाव यातील व्यथावेदना कामगाराच्या पिंडातून, माझ्या लेखणीतून, बोलीभाषेतून कागदावर उमटल्या आहेत. साहित्यकृतीशी एकरूप झाल्यानंतर त्या त्या कालखंडाची भाषा साहित्यकृतीतून उतरावी लागते.
फोटो ओळ : लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात सहभागी (डावीकडून) मृणालिनी चितळे, भारत सासणे, डॉ. निर्मोही फडके, दादाभाऊ गावडे.
प्रति,
मा. संपादक
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने 23व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. यात आज (दि. 1) भारत सासणे, मृणालिनी चितळे, दादाभाऊ गावडे यांच्याशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
शिरीष चिटणीस, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801
