श्री महालक्ष्मी मंदिरासमोर श्रीसूक्त पठणातून देवी शक्तीची स्तुती*श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम*
पुणे : ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… च्या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. शेकडो महिला व पुरुषांनी सामुहिकरित्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठणातून देवी शक्तीची स्तुती करण्यात आली. वरुणराजाने जरी हजेरी लावली असली तरी देखील माता माता की जय… चा नामघोष आणि शंख वादनाच्या निनादाने नवरात्र उत्सवातील द्वितीयेची पहाट मंगलमय झाली.
निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर,सारसबाग च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात झालेल्या सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रमाचे. यावेळी मंदिराच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. सकाळ आणि विश्वकर्मा विद्यापीठाच्या सहकार्याने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद पथकातील वादकांच्या शंखवादनाने झाली. कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय माता दी… च्या जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला. श्रीसूक्त म्हणजे काय? त्याचे महत्व आणि महती याविषयी देखील उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्रीसूक्ताचे तीन पाठ असे सामुदायिकरित्या पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. सामुहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. यंदा श्रीसूक्त पठणाच्या मोठया कार्यक्रमासह नारीशक्तीचा सन्मान, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम देखील होणार आहे. पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात सामुहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो महिला व पुरुषांनी सहभाग घेतला.
