January 19, 2026

दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरतीश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर

0
IMG-20250828-WA0021
Spread the love


पुणे : ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे ४० वे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया… असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे भारतासह विविध ठिकाणांहून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी आल्या आहेत. गणेशाचरणी लीन होत असताना बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांना आरोग्य, प्रगती आणि भरभराटीचे हे वर्ष जावो, अशी प्रार्थना त्यांनी केली. अर्चना भालेराव, प्रा. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

  • परदेशी अभिनेत्रीची पठणाकरीता उपस्थिती
    पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला ऍना मारा या इटली येथील अभिनेत्रीने देखील हजेरी लावत सहभाग घेतला.
  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवात ऋषीपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित सहभागी महिलांचा समुदाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button