January 20, 2026

बाणेर बालेवाडी मिसिंग लिंक आणि वाहतूक कोंडी प्रश्न

0
IMG-20250727-WA0022
Spread the love

जमीन अधिग्रहणाच्या समस्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंक पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, यातील अनेक विषय जमीन अधिग्रहणाअभावी प्रलंबित पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास महापालिकेला अपयश येत असल्याबद्दल तीव्र नाराजी ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली. या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, उत्तर मंडल सरचिटणीस अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार काय कार्यवाही झाली याची माहिती ना. पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने बाणेर-पाषाण लिंक रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे दोन महिन्यांत संपादन करून जमीन ताब्यात आल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण करावा,’ असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिले असतानाही अद्याप सदर विषयावर कार्यवाही झाली नाही, त्यावर ना. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर मधील लक्ष्मीमाता मंदिर येथील रस्ता रुंदीतरण यांसह वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, खड्डेमय रस्ते, नादुरुस्त पदपथ आदींवर चर्चा झाली. त्यासोबतच मिसिंग लिंकची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण होत नसल्याने त्यावर ही नापसंती व्यक्त केली.

त्यामुळे सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button