भाजपा कोथरुड मध्य मंडल कार्यकारिणी जाहीर

भाजपा मध्ये पद म्हणजे जबाबदारी- ना. चंद्रकांतदादा पाटील
भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी असते. पक्षाकडून आज ज्यांना पद मिळाले, ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. गेल्या ११ वर्षात पंतप्रधान मोदींजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करीत आहे. जवळपास २५ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आहे. हे सर्वापर्यंत पोहोचवावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा कोथरुड मध्य मंडलाची कार्यकारिणी आज जाहीर होऊन; मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उपाध्यक्ष नितीन शिंदे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला उपस्थित होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये मिळणारे पद हे केवळ नावापुरते पद नसून ती जबाबदारी असते. ती देत असताना सर्व कार्यकर्त्यांचा विचार होतं असतो. त्यामुळे आज ज्यांना ज्यांना पद मिळाले आहे, त्यांनी पूर्ण करण्यासाठी काम करावे. आपल्याकडे अनेक कार्यकर्ते असेही आहेत, ज्यांचा प्रवास बूथ अध्यक्षापासून सुरू होऊन, केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे.
ते पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींचा प्रवास अतिशय दैदिप्यमान राहिलेला आहे. तीन वेळा एका राज्याचे मुख्यमंत्री आणि सलग ११ वर्षे पंतप्रधान पद म्हणून अतिशय प्रभावी काम करत आहेत. पंतप्रधान पदाच्या काळात २५ कोटी जनता दारिद्र्य रेषेतून बाहेर आली. आज आपल्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या क्रमांकाकडे झेप सुरु आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्य प्रगतीपथावर आहे. कालच देवेंद्रजींनी शेतीसाठी कमीदराने वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मंडल अध्यक्ष निलेश कोंडाळकर म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास मी जवळून पाहिला आहे. ते जेव्हा मंडल सरचिटणीस होते, तेव्हा मी बूथचा युवा मोर्चा अध्यक्ष अध्यक्ष होतो. मंडल सरचिटणीस ते केंद्रीय मंत्री पर्यंत त्यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या. चंद्रकांतदादा पाटील यांनी ही विद्यार्थी परिषदेपासून ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असा प्रवास आहे. त्यामुळे आपण दोघांचाही आदर्श समोर ठेऊन काम केले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.