सन १८५५ मध्ये वनांत राहणाऱ्या जनजातीय लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या बलिदानाचे स्मरण व आदरांजली रविवारी (दि.२९)माय होम इंडिया व जनजाती कल्याण आश्रम तर्फे आयोजन ; सन १८५५ सालचा ब्रिटिशांच्या विरोधातील लढा

पुणे : माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रम पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सन १८५५ साली ब्रिटिशांविरोधातील लढयात हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार असून हा दिवस हूल दिवस म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने रविवार, दि. २९ जून रोजी सकाळी ९ वाजता कर्वे रस्त्यावरील स्वा. सावरकर अध्यासन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव व माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर हे प्रमुख वक्ते असणार आहेत.
कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध चे उपप्राचार्य अशोक साबळे, ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के हे मान्यवर देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘वनपुण्याई’ या जनजाती कल्याण आश्रमाच्या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने संथाल जनजातीच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानी वीरांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
सन १८५५ मध्ये आताचे झारखंड आणि त्यावेळेच्या बंगाल मधील संथाल जनजातीच्या आपल्या बांधवांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक अभूतपूर्व लढा उभा केला. दिनांक ३० जून १८५५ रोजी ४०० गावातील ५०,००० पेक्षा जनजातीय बांधव एकत्र आले आणि त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यामुळे ब्रिटिश बिथरले आणि त्यांनी १०,००० संथाल बंधू भगिनींना गोळ्या घालून मारले. हा दिवस हूल दिवस म्हणून ओळखला जातो.
त्यानिमित्ताने हा कार्यक्रम होत असून कार्यक्रमाचे आयोजन माया होम इंडियाचे आशुतोष भिसे, जनजाती कल्याण आश्रम पुणेचे अध्यक्ष प्रकाश धोका, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.