तरुण पिढी सक्षम राहिली, तरच देशाचे नेतृत्व करू शकेलराज्याच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांचे मत ; अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

पुणे : भारत हा युवकांचा देश असून युवा पिढीकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. आपण महासत्तेकडे वाटचाल करीत असताना त्यात युवक- युवतींचे योगदान मोठे आहे. तरुण पिढी सक्षम राहिली, तरच देशाचे नेतृत्व करू शकेल. तरुणाईला व्यसनाधीनतेकडे व वाईट प्रवृतींकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु असून हा देशाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे, असे मत राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर, पर्यावरण कार्यकर्ते विष्णू लांबा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ देखील घेतली.
प्रवीण पाटील म्हणाले, आपल्याकडे अनेक कायदे आहे, त्यातील कायदे चांगले व उपयुक्त देखील आहेत. आजची पिढी संस्कृतीकडून दूर जात नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे मुलांकडे लक्ष रहात असे. आता आपल्याला वेळ नाही. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष झाले, तर ती चुकीच्या मार्गाकडे जातील. प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता असून त्याकडे त्यादृष्टीने पाहायला हवे.
डॉ. मिलिंद भोई म्हणाले, अंमली पदार्था विरोधात केवळ एका दिवस नव्हे, तर वर्षभर लढायला हवे. हे पदार्थ कसे तयार होतात, त्याचे वितरण कसे होते आणि हे किती घातक आहे, याची माहिती देत आम्ही जनजागृती आम्ही करीत आहोत. सरकार आणि प्रशासन याविषयी आपापल्या स्तरावर काम करीत आहे. मात्र, लोकसहभागातून याविषयी काम होणे आवश्यक आहे.
अॅड. शार्दूल जाधवर म्हणाले, आपल्या देशात १४० कोटी नागरिक राहतात. त्यातील ८५ कोटी पेक्षा जास्त युवा पिढी आहे, असे अनेक सर्वेक्षणात म्हटले आहे. युवा पिढी व्यसनाधीन आहे की नाही, यावरून त्या देशाचे भविष्य समजू शकते. त्यामुळे दारू, अंमली पदार्थ याकडे आकृष्ट होणाऱ्या पिढीला त्यापासून दूर ठेवायला हवे.
- फोटो ओळ : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ घेतली.