पतित पावन संघटनेतर्फे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

कै. बबनराव पांडे आणि कै. सुनील दाभाडे यांच्या स्मरणार्थ आयोजन ; एकूण १२४८ कुटुंबांतील सुमारे ८५०० नागरिकांना लाभ
पुणे : पतित पावन संघटनेतर्फे कै. बबनराव पांडे आणि कै. सुनील दाभाडे यांच्या स्मरणार्थ ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात करण्यात आले. या उपक्रमात आमदार हेमंत रासने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी सीमा गेजगे, महेश पांडे, दाभाडे आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या धकाधकीच्या जीवनात शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासकीय दाखले मिळवताना होणारा त्रास लक्षात घेऊन ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल नाईक, राजाभाऊ राजपूत, महेश पाटोळे, आदित्य परदेशी, अक्षय अभंग, पराग नाईक यांनी केले. त्यांच्यासोबत संघटनेचे पदाधिकारी दिनेश भिलारे, यादव पुजारी, योगेश वाडेकर आणि इतर सदस्यही उपस्थित होते. या उपक्रमाचा लाभ एकूण १,२४८ कुटुंबांतील सुमारे ८,५०० नागरिकांनी घेतला.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. रेशन कार्डमधील नावांमध्ये बदल, ५ ते १८ वयोगटातील मुलांचे नवीन आधारकार्ड तयार करणे व दुरुस्ती करणे, श्रावण बाळ योजना, शहरी गरीब योजना, संजय गांधी निराधार योजना, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, नवीन पॅन कार्ड काढणे व दुरुस्ती करणे, रहिवासी (डोमिसाईल) प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, सर्व जातीचे दाखले, एसटी महामंडळाच्या विविध योजना तसेच धर्मादाय योजनांची माहिती या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली.