July 4, 2025

कवींच्या आशयघन भावभावनांचा फुलला ‌‘करम बहावा‌’करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन

0
IMG-20250608-WA0035
Spread the love

पुणे : ‌‘माझ्या आजीच्या गावाला मोठा चौसोपी वाडा‌’, ‌‘बंद मुठी डोळ्यासमोर नाचवत छकुली म्हणाली‌’, ‌‘माझ्या मधल्या मुक्ताईने साद घातली, माझ्या देहाची ताटी झाली‌’, ‌‘आजोबांच्या ताठ कण्याचा पाठ वाचला आहे‌’, ‌‘का तुझ्या पश्चातही इच्छा अवास्तव राहिल्या‌’, ‌‘जपत जगाला कार हाकणे नामंजूर‌’, ‌‘ती वात होऊनी जळते कणाकणाने‌’ अशा विविध आशयघन कविता, गझला, रुबाया, बाल कवितांद्वारे ‌‘करम बहावा‌’ मैफल रंगली. रसिकांची मनमुराद दाद, हशा, टाळ्या तर कधी पापण्यांच्या कडा ओलावत रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 8) सदाशिव पेठेतील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‌‘करम बहावा‌’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिलिंद छत्रे, निरुपमा महाजन, डॉ. मंदार खरे, वैशाली माळी, भालचंद्र कुलकर्णी, शिवाजी सुतार, योगेश काळे, राहुल कुलकर्णी या करम प्रतिष्ठानच्या नामवंत कवी, कवयित्रींचा सहभाग होता.

प्रास्ताविकात करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांनी ‌‘करम बहावा‌’ या कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांविषयी अवगत केले. ‌‘शेर गुंफायची प्रेरणा देऊनी एक मिसरा तरी ऐकला पाहिजे‌’ हा शेर सादर केला. ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन यांची उपस्थिती होती.

‌‘बाबा माझ्या वाढदिवशी विमान आणा भारी‌’, ‌‘पूर्वी शब्द स्फूरायचे उसळून यावी जशी लाट‌’ या सादरीकरणातून कल्पक लहान मुलाने वडिलांकडे केलेला हट्ट तसेच पुरुषांची अंर्तमुखता मांडण्यात आली. ‌‘दोष व्यथेचा सांग‌’, ‌‘देव थाटला आहे ज्यांनी दगडा दगडांमध्ये‌’, ‌‘साळसुदांच्या सभेत मन अवघडले आहे‌’, ‌‘आज का तक्रार तुमची मी न काही बोलतो‌’, ‌‘मी माझा आसरा शोधला आहे‌’ या रचनांमधून प्रेम, विरह, सामाजिक वास्तव यांवर भाष्य केले गेले.

‌‘सागराला भेटायला नदी दूर दूर जाते, संगमाच्या क्षणी मात्र तिची घालमेल होते‌’ या अष्टाक्षरीतून घडलेल्या नवविवाहित स्त्रीच्या मानसिक आंदोलनांचे यथार्थ वर्णन रसिकांना भावले. ‌‘कुणीच नसते आईनंतर, बाल्य संपते आईनंतर‌’ या कवितेच्या सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

देशासाठी लढणारे सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यातील भावनोत्कटता दर्शविणारे ‌‘धो धो कोसळणाऱ्या या पावसात तो बोलत राहिला रात्रभर तिच्याशी अखंड‌’ हे काव्य रसिकांना विशेष भावले.

ग. दि. माडगुळकर, सुरेश भट, रॉय किणीकर यांच्या जीवनप्रवासातील काही बोलके किस्सेही या प्रसंगी उलगडले गेले. कार्यक्रमाची सांगता ‌‘दुर्लभ हा देह फुकाचा मिळाला, मज चांडाळाला चाड नाही‌’ या आशयपूर्ण अभंगाने करण्यात आली.

युद्धभूमीवरील अनुभव कथन

लेफ्टनंट कर्नल चारुदत्त रानडे यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनुभव कथन केले. भारतीय सैन्याची ताकद, राजनैतिक धोरण, कूटनीती, नवीन तंत्रज्ञान, विविध कार्यप्रणाली, राष्ट्रीय आपत्ती समयी दिसलेली राष्ट्रीय एकता, दळणवळणाच्या सोयी, सुव्यवस्था ठेवण्यासाठी केलेले उपाय, देशवासियांना सामाजिक अस्थिरतेपासून दिलेले संरक्षण यांविषयी त्यांनी सविस्तर कथन केले. युद्ध प्रसंगी सैन्यदलाचा शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस लागलो. कुटुंबियांची भक्कम साथ, त्यांचे मानसिक स्थैर्य आणि धीर यांच्या आधारे आम्ही एकाग्रतेने कार्य करू शकतो, असे रानडे यांनी अभिमानाने सांगितले. दीप्ती रानडे यांची विशेष उपस्थिती होती.

कवींचा परिचय मुक्ता भुजबले, वासंती वैद्य यांनी करून दिला तर वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार भूषण कटककर यांनी मानले.

फोटो ओळ : ‌‘करम बहावा‌’ कार्यक्रमात सहभागी कवींसह भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, मुक्ता भुजबले, प्राजक्ता वेदपाठक, वासंती वैद्य, वैजयंती आपटे.
फोटो : दीप्ती रानडे आणि चारुदत्त रानडे यांचा सत्कार करताना प्रज्ञा महाजन आणि भूषण कटककर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button